वागदरी ,दि. २८: एस.के.गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील वागदरी  शिवारात मंगळवारी  अचानक मेघगर्जना होवुन जोरदार पाऊस सुरु असतानाच वीज पडून गाय जागीच मरण पावली तर पावसामुळे शेतातील पिक काढणी करणा-या शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

दि.२७ सप्टेंबर  रोजी तुळजापूर तालुक्यातील वागदरी व परिसरात दुपारी ३.४५ वा.दरम्यान अचानक वीजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. यावेळी वागदरी शिवारात तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष फतेसिंग ठाकूर यांच्या शेतातील बांधावर  असलेल्या दुभत्या गायीवर वीज कोसळल्याने गायीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. 
 

 सरत्या पावसातील हस्त नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास वागदरी व परिसरात अचानक पावसाला सुरुवात झाली.काही मिनिटात पावसाने उग्र रूप धारण केले. विजेच्या कडकडाट सुरू झाला. शेतकऱ्यांची एकच धावपळ सुरू झाली. उडीद काढून जमीनीवर टाकलेले भिजून गेले. शेतकऱ्यांना स्वतःला आसरा गाठने कठीण झाले. काहीनी आपापल्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये आसरा घेतला. 
  

वागदरी येथील शेतकरी फतेसिंग ठाकूर व इतरांनी  शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये आसरा घेतला. पण शेडच्या जवळच अंतरावर असलेल्या बांधावरील लिंबाच्या झाडाखाली त्यांची गाय पावसाचे टपोरे थेंब अंगावर झेलत उभी होती. आचानक विजेचा जोरदार कडकडाट झाला आणि वीज  गायीच्या अंगावर कोसळली.त्यातच त्या गायीचा दुर्दैवी मृत्यू झाला.गायीच्या दुर्दैवी मृत्यू बद्दल शेतकरी ग्रामस्थातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
 
Top