तुळजापूर, दि. २७ ,डॉ. सतीश महामुनी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला सोमवारी दुपारी बारा वाजता घटस्थापना कार्यक्रमाने सुरुवात झाली आहे. मंदिर संस्थानचे अध्यक्ष श्री व सौ कौस्तुभ दिवेगावकर यांनी यजमान म्हणून घटस्थापना केली. घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी सुमारे दीड लाख भाविकांनी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले .
श्री तुळजाभवानी देवीचे शारदीय नवरात्र महोत्सव घटस्थापना या पहिल्या धार्मिक कार्यक्रमाने सुरू झाले. तत्पूर्वी 17 सप्टेंबर रोजी तुळजाभवानी देवीची सुरू झालेली यात्रा मध्यरात्री एक वाजता पूर्ण झाली, आई राजा उदो उदो सदानंदीचा उदो उदो, अशा जयघोषात व मंगलमय वातावरणात मध्यरात्री तुळजाभवानी देवीची मूर्ती शेज घरामधून चांदीच्या मुख्य सिंहासनावर प्रतिष्ठापित करण्यात आली. हळद आणि मेन याच्या साह्याने चांदीची सिंहासनावर मूर्ती स्थापित करण्यात आली. त्यानंतर देवीला दही आणि दुधाचे अभिषेक घालुन नैवेद्य दाखविण्यात आले व भाविकांचे दर्शन सुरू करण्यात आले. पुन्हा सकाळी सात वाजता देवीला दही दुधाचे अभिषेक करण्यात आले आणि नित्योपचार पूजा संपन्न झाली.
पाळीचे पुजारी शशिकांत पाटील आणि इतर सहकारी सचिन परमेश्वर, शशिकांत परमेश्वर, बब्बू सोनजी, यांच्यासह इतर सहकारी या पूजा बांधणीसाठी उपस्थित होते.
सकाळी 11 वाजता घटाची मिरवणूक काढण्यात आली, तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर, आमदार राणा जगजितसिंह पाटील, महंत तुकोजी महाराज, महंत चिलोजी महाराज, जारी मंडळाचे अध्यक्ष सज्जन साळुंखे, उपाध्यक्ष विपिन शिंदे, तुळजाभवानी भोपे मंडळाचे अध्यक्ष अमर परमेश्वर, तुळजाभवानी उपाध्य मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो, धार्मिक व्यवस्थापक विश्वास कदम, जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे, व्यवस्थापक सिद्धेश्वर इनतुले, दत्तात्रय कुलकर्णी, किशोर गंगणे, सुधीर परमेश्वर, सचिन परमेश्वर, शशिकांत पाटील अतुल पाटील, संजय पेंदे, गोविंद लोंढे, मकरंद प्रयाग, इंद्रजीत साळुंखे ,विकास मलबा, कुमार इंगळे, गणेश रसाळ, विशाल रोचकरी, महेश चोपदार, संजय सोनजी ,जगदीश पाटील, उदय कदम ,श्रीराम अपसिंगेकर, राजाभाऊ ओवरीकर, राजकुमार भोसले, प्रवीण अमृतराव यांच्यासह इतर पुजारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संबळाचा कडकडाट आणि जय भवानी, जय शिवाजी, आई राजा उदो' उदो च्या जयघोषात मिरवणुकीमध्ये कुंकवाची मुक्त उधळण करत पहिल्यांदा सिंह गाभाऱ्यात तुळजाभवानी देवीचे घट बसवण्यात आले.
यावेळी धान्य मानकरी प्रफुल्लकुमार शेटे यांची उपस्थिती होती. विधीवत काळी माती आणि इतर साहित्य धान्य याच्या साह्याने व धार्मिक परंपरेनुसार घटस्थापना संपन्न झाली. त्यानंतर यमाई मंदिर त्रिशूल मंदिर आणि आदिमाया आदिशक्ती येथे विधिवत घटस्थापना संपन्न झाली.
यावर्षी मोठ्या संख्येने शारदीय नवरात्र महोत्सवांमध्ये भाविकांची संख्या राहणार आहे. असा पूर्व अंदाज असल्यामुळे प्रशासनाने भाविकांच्या दर्शनाची सोय केली आहे. रात्रीपासून खूप मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी दर्शनासाठी येत असताना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर जलद दर्शन करण्याच्या अनुषंगाने वेगवेगळे मार्ग निश्चित केले असून सर्वत्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकारी हे यात्रेवर नियंत्रण करीत आहेत.
नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी चांगला व्यापार होणार असल्याचा अंदाज व्यक्त करून आपल्या व्यवसायाची मोठी साधनसामग्री गोळा केली आहे. पाण्याच्या बाटल्या खूप मोठ्या संख्येने विक्री करण्यासाठी मोठ्या प्रमाणात दुकाने थाटण्यात आली आहेत. प्रासादिक भंडाराची दुकाने चार पटीने वाढली आहेत. यावर्षी मंदिर संस्थान कडून चप्पल ठेवण्यासाठी भाविकांची केलेली व्यवस्था अपुरी असल्याचे दिसून येत आहे. चप्पल स्टैंडच्या कमतरतेमुळे भाविकांची तारांबळ उडत आहे