काटी ,दि . २८ : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील पाच एकर परिसरात असलेल्या व पाच बुरुज असलेला दगडी तटबंदीचा जवळपास पाचशे वर्षांपूर्वीचा कै. रावसाहेब देशमुख व माजी चेअरमन सयाजीराव देशमुख यांच्या वाड्याच्या पाठीमागील बाजूची दगडी तटबंदीची भिंत बुधवार दि. 28 रोजी पहाटे पाचच्या सुमारास कोसळली. हि घटना पहाटे घडल्यामुळे सुदैवाने कुठलेही जीवितहानी झाली नाही.
मात्र भिंतीच्या बाजुला लावलेली प्रदीप साळुंके यांच्या होन्डा गाडीचा समोरील भाग चक्काचूर झाला.तर सुहास साळुंके यांच्या ट्रॅक्टरचे रोटर ढासळलेल्या दगडाखाली अडकून पडले आहे. दगडी तटबंदीचा अर्धवट भाग कोसळल्याने धोका निर्माण झाला. संपुर्ण वाड्याच्या दगडी भिंतीला मोठमोठ्या भेगा पडल्याने व भिंतीवर मोठमोठे झाडे आल्याने दगडी तटबंदीच्या आजुबाजुच्या घरांना धोका निर्माण आहे.
काटी हे गाव अनेक पुरातन वास्तूमुळे प्रसिद्ध असणारे गाव म्हणून ओळखले जाते. निजामशाही काळात या वाड्याचा आधार निजामाच्या अतिक्रमणावेळी गावातील लोक आश्रयासाठी घेत असल्याची आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे या गावास ऐतिहासिक महत्व आहे. या वाड्याला असलेली भली मोठी तटबंदी भिंत व तटबंदी भिंतीच्या कडेला असलेले पाच मोठे बुरुज पुर्व वैभवाची साक्ष देत आहेत.
भिंतीवरील झाडे लवकर काढणार
दगडी तटबंदीच्या भिंतीवर आलेली झाडे लवकरात लवकर समुळ नष्ट करणार असून दगडी तटबंदीलगत असणाऱ्या कुटूंबियांनी सतर्क राहण्याचे आवाहन वाड्याचे मालक तथा माजी चेअरमन सयाजीराव देशमुख यांनी केले आहे.