तुळजापूर, दि. २९ 

 नवरात्र महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी हजारो भाविक भक्तांनी तुळजाभवानी देवीचे मनोभावे दर्शन घेतले. देवीचे दही आणि दुधाचे अभिषेक मंगलमय वातावरणात संपन्न झाले, 

अभिषेकानंतर जांभळ्या रंगाचा तुळजाभवानी देवीला घातलेला शालू आणि केलेली सजावट अत्यंत देखणी आणि नेत्रदीपक असल्यामुळे भाविक भक्तांनी तुळजाभवानी देवीच्या सजावटीचे कौतुक केले.

लाल आणि सोनेरी रंगांमधील नेतृत्व दीपक मनमोहक फुलांची केलेली सजावट आणि तुळजाभवानीला घातलेले प्राचीन मौल्यवान अलंकार, अंगावर नेसवलेला जांभळ्या रंगाचा शालू आणि भवानी मातेच्या पुजाऱ्यांनी अत्यंत नाजूकपणे केलेली देवीची पूजा या अनेक वैशिष्ट्यामुळे तिसऱ्या दिवशी तुळजाभवानीचे दर्शन घेणाऱ्या भाविकांना सुखद अनुभव आला. चांदीच्या सिंहासनावर करण्यात आलेली सजावट आणि सिंहासनाच्या पाठीमागे करण्यात आलेली सजावट यामुळे देवीचे वेगळे रूप पाहावयास मिळाले.


मंगळवारी रात्री दहा वाजता तुळजाभवानी देवीचा निघालेल्या छबिनामध्ये हजारो भाविकांची उपस्थिती होती. रात्रभर देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी कायम होती. मध्यरात्री दर्शन मंडपामध्ये भाविकांना सोडण्यात आले. त्यानंतर धर्मदर्शन आणि मुखदर्शन या रांगा सुरू झाल्या. सकाळी सात वाजता देवीचे दही आणि दुधाचे अभिषेक सुरू झाले. त्यानंतर देवीचे नित्य उपचार पूजा संपन्न झाली. आरती आणि नैवेद्य देवीला दाखवण्यात आला. 



शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या दिवशी मंदिर परिसर आणि गाभारा परिसर याची फुलांची सजावट करण्यात आली होती. दरम्यान पावसामुळे भाविकांना पावसाचा त्रास सहन करावा लागला. दिवसभर 90 हजार भाविकांनी दर्शन घेतल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.
 
Top