तुळजापूर दि.३०: डॉ. सतीश महामुनी

तीर्थक्षेत्र असणाऱ्या तुळजापूर शहरांमध्ये दोन बस स्थानक असून दोन्ही बस स्थानकामध्ये भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची दुरावस्था आहे, बस स्थानकामधील किरकोळ सुविधा देखील देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ असमर्थ ठरले आहे. 

तुळजापूर येथे दररोज हजारो भाविक आणि ग्रामीण भागातील प्रवासी येतात. जुने बस स्थानक अत्यंत मोक्याच्या जागेवर असल्यामुळे तेथील बस स्थानक अपुरे आहे. मात्र तेथील प्रवाशांची वाहतूक आणि यातायात अत्यंत जलद गतीने असल्यामुळे ही अडचण लक्षात येत नाही. परंतु राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने तसेच उस्मानाबाद विभागीय अधिकारी व तुळजापूर येथील आगार प्रमुख यांचे नागरिकांच्या सुविधाकडे संपूर्ण दुर्लक्ष होत  आहे. कोणतीही सुविधा नागरिकांना या बस स्थानकामध्ये मिळत नसल्याचे चित्र आहे. अनेक वर्षापासून नागरी सुविधांची दुरावस्था असून देखील तुळजापूर येथील कोणताही लोकप्रतिनिधी यासंदर्भात प्रयत्न करत नाहीत. उलट बस स्थानकाच्या परिसरात आपल्या समर्थकांचे अतिक्रमण करण्यासाठी स्पर्धा लागलेली आहे. राज्य सरकारने नवीन बस स्थानक बांधून दिले.  मोठा खर्च करून बांधलेल्या बस स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर पंधरा-वीस  व्यवसाय करणाऱ्या लोकांनी अतिक्रमण केले आहे. हे अतिक्रमण देखील परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना थांबवता आले नाही. याकडे त्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे आज त्या ठिकाणी लोकांनी आपले व्यवसाय तंबू ठोकून सुरू केले आहेत. परिणामी अद्यावत आणि देखणे प्रवेशद्वार असणाऱ्या या बस स्थानकाच्या प्रवेशद्वारा मधून बस स्थानकामध्ये प्रवेश करता येत नाही. तेथे मातीचे ढिगारे आणि अतिक्रमण झालेले आहे.

परिवहन महामंडळाचे अधिकारी केवळ तुळजापूर येथील बस मधून मिळणारे उत्पन्न पाहतात येथील भाविकांच्या पैशावर परिवहन महामंडळाचा कारभार चालतो. परंतु भाविकांना पिण्याचे पाणी, थांबण्यासाठी निवारा, बसण्यासाठी आसन  व्यवस्था याशिवाय इतर किरकोळ सुविधा देण्यात येत नाहीत. नागरिक या संदर्भात आपली नाराजी व्यक्त करतात, परंतु त्याचा कोणताही परिणाम या परिवहन महामंडळाच्या प्रशासनावर आजपर्यंत झालेला नाही.



 तुळजापूरचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी तुळजापूर शहराला विकसित करण्याचे आश्वासन अनेक वेळा दिले. शहरामध्ये वैश्विक शैक्षणिक संकुल उभारणार असे आश्वासन दिले परंतु साधी वीट देखील आमदार महोदयांनी ठेवलेली नाही. बसस्थानकासारख्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे त्यांचे दुर्लक्ष आहे. नगरपालिकेचे सर्व पदाधिकारी देखील या महत्त्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात.

जुन्या बसस्थानकामध्ये मागील तीन महिन्यापासून मातीचे ढिगारे आणि पाऊस पडल्यानंतर चिखल होत आहे. अनेक वेळेस याविषयी आवाज उठवून देखील परिवहन महामंडळाच्या प्रशासनाने मुरूम टाकण्या पलीकडे काहीही केले नाही. सदरील मुरूम देखील अपूर्ण टाकला असून त्याची दबाई करण्यात आलेली नाही. बस स्थानकामधील स्वच्छतागृह दुर्गंधीयुक्त असून तेथे जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे नाईलाज असतो, लोकांना बाटलीचे विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. सभोवताली व्यवसाय करणारे लोक देखील या प्रकारामुळे हैराण झाले आहेत.

उस्मानाबाद विभागीय परिवहन महामंडळाचे अधिकारी आणि तुळजापूर आगार प्रमुख यांनी तातडीने नवीन बस स्थानक आणि जुने बस स्थानक येथे अध्यायवत पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी उपाययोजना करावी अशी प्रवाशांची मागणी आहे. महामंडळाच्या परिपत्रकानुसार ज्या सुविधा बस स्थानकामध्ये असणे अपेक्षित आहे त्या सर्व सुविधा तातडीने पूर्ण कराव्यात. बस स्थानक परिसर अतिक्रमणमुक्त आणि अवैध वाहतूक मुक्त करण्यात यावा. जबाबदार अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमपणा स्पष्टपणे महामंडळाच्या कारभारात दिसतो आहे.
 
Top