चिवरी , दि. २१ : राजगुरु साखरे

खरीप हंगामातील सोयाबीन पिक शेतकऱ्यांच्या हाती येण्याची वेळ जवळ आली आहे, त्यातच बाजारातील दरात मोठी घसरण सुरू आहे. सोयाबीनचे दर पाच हजारावर येऊन ठेपले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. 


यंदा उस्मानाबाद  जिल्ह्यामध्ये उशिरा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरिपातील पिकांची उशिरा पेरणी केली. प्रामुख्याने जिल्ह्यामध्ये अलीकडे सोयाबीन पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहिले जाते, त्यामुळे सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे, त्यातच सोयाबीनवर सुरुवातीच्या काळात शंखी गोगल गायीचा प्रादुर्भाव, ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यामध्ये अतिवृष्टी सततचा पाऊस , यलो मॅझक या कीड रोगाच्या प्रादुर्भावामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे निसर्गाच्या संकटातून कसेबसे पीक वाचवुन चांगला भाव मिळेल. या आशेने शेतकरी बसला होता, मात्र  मागील महिन्यापासून दरात होत असलेली घसरण यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक कोंडीत सापडला आहे.


गेल्यावर्षी सोयाबीनचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले होते.  परंतु त्यावेळी शेतकऱ्याकडे सोयाबीन शिल्लक नव्हते. केवळ व्यापाऱ्याकडेच माल शिल्लक होते. मागील तीन वर्षापासून शेतकऱ्यांना कधी अतिवृष्टी कधी पावसाचा खंड, विविध कीड रोगाच्या प्रादुर्भावामुळे कंबरडे मोडले आहे. शेतीतून मिळणाऱ्या उत्पादनापेक्षा खर्च  अधिक होत असल्याने दरवर्षी शेतकऱ्याच्या आर्थिक अडचणीत भर पडत आहे. 


निसर्गाच्या लहरीपणाचा उत्पादनावर मोठ्या प्रमाणावर फटका बसत आहे. महागाईच्या तुलनेत सरासरी आठ ते नऊ हजार पर्यंत भाव   ठेवणे गरजेचे आहे असे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे. सोयाबीन काढणी पंधरा दिवसावर आल्याने अचानक भाव  गडगडल्याने शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे. 
 
बालाजी गिराम, शेतकरी

सोयाबीनला चांगला भाव मिळेल या आशेने पेरणी केली, माञ सततचा पाऊस, किडरोगाचा प्रादुर्भाव यामुळें पिकांचे नुकसान झाले, यातच सोयाबीनचे दर घसरल्याने मोठी आथिर्क कोंडी झाली आहे.   
 
Top