तुळजापूर, दि. ६ :डॉ. सतीश महामुनी
नगरपालिकेची शाळा म्हटले की सुमार दर्जाची शाळा अशी लोकभावना आहे. परंतु तुळजापूर नगर परिषदेच्या शाळा क्रमांक 3 ने गेल्या दहा वर्षांमध्ये केलेल्या कामगिरीने या विधानाला चुकीचे ठरवले आहे.
वेगवेगळे चांगले शैक्षणिक उपक्रम चालवून या प्रशालेने मराठवाड्यात पहिल्या क्रमांकाचे स्थान प्राप्त केले आहे, या गणेशोत्सवाच्या कालावधीत याप्रशालेने प्रशालेसाठी सौरऊर्जा प्रकल्प बसून शून्य रुपये वीस बिल करणारी शाळा असा मान मिळवला आहे.
नगरपरिषद शाळा क्रमांक 3 चे शिक्षक आणि त्यांना मार्गदर्शन करणारे नगर परिषदेचे प्रशासक यांनी वेळोवेळी या प्रशालेला दर्जेदार करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. छोट्या छोट्या परंतु शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या घटकांना बाजूला न करता त्यावर शंभर टक्के काम करून विद्यार्थ्यांच्या सोयीचा आणि प्रशालेसाठी उपयुक्त कामगिरी केल्यामुळे ही प्रशाला मराठवाड्यात अव्वल ठरली आहे, त्यामुळे या शाळेचा पट शंभर टक्के पूर्ण आहे.
दि .5 सप्टेंबर 2022 रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून नगर परिषद शाळा क्रमांक 3 तुळजापूर (खुर्द) या शाळेत सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन तुळजापूर नगर पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद नातू यांच्या हस्ते करण्यात आले. नगरपालिकेकडून चालवण्यात येणाऱ्या शाळेने केलेली प्रगती कौतुकास्पद असताना प्रशालेसाठी सर्व प्रकल्प यशस्वीपणे साकार करणारी ही पहिली प्रशाला ठरली आहे.
तुळजापूर नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर माजी शिक्षण सभापती मंजुषा देशमाने, माजी नगसेवक पंडितराव जगदाळे, तुळजाई नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन राजाभाऊ देशमाने,तुळजापूर नगर पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक वैभव पाठक, विद्युत अभियंता सुशील सोनकांबळे, अशोक सनगले यांची उपस्थिती होती.
शाळा क्रमांक 3 तुळजापूर (खुर्द )च्या शाळेत सर्व वर्गातील विद्युत दिवे, पाणी फिल्टर, विद्युत पंखे, शाळेतील स्मार्ट टीव्ही, एल ई डी प्रोजेक्टर, स्मार्ट बोर्ड असे सर्व विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण देणारी अत्याधुनिक विद्युत उपकरणे यापुढे सौर ऊर्जेवर चालतील.
नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 3 तुळजापूर (खुर्द) शाळेला या पूर्वी सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमात 'उत्कृष्ट शाळा'हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. तसेच मराठवाड्यातील पहिली ISO मानांकन प्राप्त करणारी नगर पालिका शाळा हा बहुमान ही शाळेने मिळविलेला आहे.
एकीकडे जिल्हा परिषद शाळेच्या आणि नगर पालिकेच्या शाळेची पटसंख्या कमी होत असताना नगर पालिका शाळा क्रमांक 3 तुळजापूर खुर्द च्या शाळेत प्रवेशासाठी प्रतीक्षेत थांबावे लागते.