काटी, दि. १० :
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी भाजपचे आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी राज्य शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून राज्य शासनाने या प्रकल्पासाठी 11700 कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्याबद्दल तुळजापूर तालुक्यातील भाजप कार्यकर्ते व शेतकऱ्यांच्या वतीने आ. सुजितसिंह ठाकूर यांचा सत्कार करून आभार मानले.
आमदार सुजितसिंह ठाकूर हे सिद्धिविनायक परिवाराच्या गूळ पावडर कारखान्याच्या प्रथम गळीत हंगामाच्या कार्यक्रमाकरिता आले असता या कार्यक्रमात तुळजापूर तालुक्यातील भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड.अनिल काळे व भाजपचे सर्व पदाधिकारी तसेच शेतकरी यांनी त्यांचा सत्कार केला. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने 11700 कोटी रुपये मंजूर केले. राज्य कॅबिनेट मंत्री मंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे उस्मानाबाद, बीड जिल्ह्यामध्ये हरितक्रांती होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची कृष्णा खोऱ्याचे पाणी तालुक्याला मिळावे अशी मागणी होती. परंतु या मागणीला फारसे यश येत नव्हते. परंतु आ.ठाकूर या प्रकल्पासाठी 2014 पासून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे पाठपुरावा करीत होते. त्यासाठी त्यांनी या प्रकल्पासाठी पर्यावरण विभागाची मान्यता मिळवून पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचेकडे सातत्याने पाठपुरावा करुन पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळवून कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प आणण्यासाठी मार्ग सुकर केला असून आ. ठाकूर यांचा या प्रकल्पासाठी सिंहाचा वाटा असल्याचे ॲंड. अनिल काळे यांनी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या कामासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने तब्बल 11700 कोटी रुपये मंजूर केले असून हा प्रकल्प 2024 पर्यंत निश्चित पुर्ण होऊन तुळजापूर तालुक्यातील केमवाडी सावरगाव काटी येथून पांगरधारवाडी तलावातून रामधरा तलावामध्ये पाणी सोडण्यात येणार असून पुढे लोहरा उमरगा तालुक्यात हे पाणी जाणार आहे. त्यामुळे भूम, परंडा, व वाशी विधानसभा मतदारसंघात व उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यात 21 टीएमसी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अनेक वर्ष पाण्याच्या बाबतीत दुष्काळी असलेला तुळजापूर तालुका सुजलाम होईल असे मत ॲड. अनिल काळे यांनी व्यक्त केले.
यावेळी सिद्धिविनायक परिवाराचे सर्वेसर्वा दत्ता कुलकर्णी, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, प्रभाकर मुळे, दत्ता राजमाने, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, विजय शिंगाडे,नागेश नाईक, आदेश कोळी, लक्ष्मण उळेकर, सुखदेव टोंपे यांच्यासह शेतकऱी उपस्थित होते.