नळदुर्ग , दि.१०

कोरोनाच्या दोन वर्षानंतर  नळदुर्ग शहरात ईद-ए-मिलाद सण ( पैगंबर जयंती) भव्य दुचाकी मिरवणुक  काढून  उत्साहात साजरा करण्यात आला.

 रविवार दि. 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता शहरातील क्रांती चौक येथून  सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांच्या हस्ते हाफेज व खारी सय्यद मैनोद्दीन जागीरदार, ईद-ए-मिलाद कमिटीचे प्रमुख आलेम मोहम्मद रजा, हाफेज सय्यद नियामतुल्ला इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत झेंडा दाखवून मोटरसायकल व रिक्षा रॅलीस सुरुवात करण्यात आली. या रॅलीमध्ये  मोटार सायकलस्वार, रिक्षा चालक बहुसंख्येनी सहभागी झाले होते. ही रॅली भवानी चौक, शास्त्री चौक, बसस्थानक समोरून राष्ट्रीय महामार्गाने गोलाई, इंदिरानगर, महामार्ग पोलीस ठाणे , हुसेनी चौक, नानीमा रोड, चावडी चौक, डीसीसी बँक समोरून धर्मवीर संभाजी चौक, मोहम्मद पनाह , काजी गल्ली, मुलतान गल्ली, किल्ला गेट मार्गाने परत बस स्थानकासमोर आल्यानंतर ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने आयोजित  पूजा करुन महाप्रसादाचे वाटप करून या रॅलीचा समारोप करण्यात आला.  



त्यानंतर रहीमनगर, ख्वाजा नगर, इंदिरानगर, नानिमा रोड येथील देखावे मिरवणुकीसह  आसार मस्जिद येथे आल्यानंतर दुपारी तीन वाजता जुलूस ए मोहम्मदीच्या मुख्य मिरवणुकीची सुरुवात हाफेज व खारी सय्यद मैनोद्दीन जागीरदार, आलेम मोहम्मद रजा,हाफेज कौसर पाशा जागीरदार,हाफेज फुरकान नक्शबंदी,हाफेज फारुख अहेमद, हाफेज मुसा जमादार, मौलाना शफिक रजा, मौलाना सादिक रजा, मौलाना आझम रजा,हाफेज शोहेब रजा, हाफेज इस्माईल काझी, हाफेज जाफर शाह, हाफेज मुजफ्फर शेख,  पेशइमाम सिद्दिक शेख आदीसह विविध  क्षेत्रातील प्रमुखाच्या उपस्थितीत  करण्यात आले. हि मिरवणूक काजी गल्ली,मोहदीस ए दख्खन हजरत अब्दुल्ला शहा साब चौक, मुलतान गल्ली, किल्ला गेट, कुरेशी गल्ली, इनामदार गल्ली, हत्ती मोहल्ला, भवानी चौक, चवडी चौक, भोई गल्ली मार्गाने परत आसार मस्जिद समोर आल्यानंतर मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. मिरवणुकीत सहभागी झालेले विविध भागातील देखावे आकर्षणाचा केंद्रबिंदू बनले होते. मिरवणुकीच्या दरम्यान शहरात सामाजिक व धार्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संघटनांच्या वतीने शहरातील विविध भागात फातेहाखानी करून ज्यूस व मिठाईचा कार्यक्रम घेऊन तबरूक वाटप करण्यात आला. त्याचबरोबर  शहरातील विविध भागात ईद-ए-मिलाद निमित्त रोषणाई करण्यात आली होती. ईद-ए-मिलादच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अंजूम शेख,  सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, सुधीर मोटे,पिराजी तायवडे,जिविशाचे धनंजय वाघमारे,अच्युत पोतदार यांच्यासह नळदुर्ग पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी चोख  पोलीस बंदोबस्त ठेवला होता. 

मिरवणुकीच्या काळात अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी भेट देऊन बंदोबस्ताची पाहणी केली. ईद-ए-मिलाद निमित काढण्यात आलेली रॅली व मिरवणुकीसाठी  ईद मिलादुन्नबी कमिटी तसेच शहरातील मुस्लिम समाजातील विविध सामाजिक व धार्मिक संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी पुढाकार घेतले.
 
Top