तुळजापूर, दि. ९: डॉ. सतीश महामुनी

 कोजागिरी पौर्णिमे निमित्ताने श्री तुळजाभवानी मातेचे   सहा लाख भाविकांनी  मनोभावे दर्शन घेतले. महाराष्ट्र ,कर्नाटक ,आंध्रप्रदेश, तेलंगणा अशा चार राज्यांमधून भाविकांची अलोट गर्दी तुळजापुरात आल्यानंतर सर्वत्र भाविकांचा महापूर दिसून आला. कडेकोट पोलीस बंदोबस्त व वाहतूक व्यवस्था  सर्वत्र तैनात असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार या मोठ्या संख्येच्या यात्रेमध्ये दिसून आला नाही.
 

 तुळजाभवानी देवीची सीमोल्लंघन सोहळ्यानंतर घेतलेली श्रमनिद्रा पूर्ण झाली. परंपरागत पद्धतीने आणि विधिवत तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा पूर्ण झाल्याचा धार्मिक विधी देवीचे भोपे पुजारी यांनी पूर्ण केला.  


भिंगार येथील  मानाच्या पलंगावरून देवीची मूर्ती मुख्य गाभाऱ्यात चांदीच्या सिंहासनावर प्रतिष्ठापित करण्यात आली. धार्मिक पद्धतीने पूजा आणि आरती संपन्न झाली. अडीच ते तीन च्या दरम्यान मध्यरात्री भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात आले. धर्मदर्शन आणि मुखदर्शन दोन्ही रांगे मधून पहाटेपर्यंत   भाविकांनी दर्शन घेतले.
सकाळी सात वाजता तुळजाभवानी देवीची अभिषेक पूजा सुरू झाली त्यानंतर नृत्य उपचार पूजा नैवेद्य आणि आरती असे रोजचे विधी संपन्न झाले. दरम्यान भाविकांची दर्शनाच्या रांगा जलद गतीने करण्यात आले. रात्रभर भाविकांचा ओघ तुळजापूर शहरात सुरू होता. घाटशिळ मार्गाने भाविकांना दर्शन मंडपात प्रवेश देण्यात आला आणि तेथून धर्मदर्शन आणि मुखदर्शनाच्या रांगा सुरू होत्या. सर्वत्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. बंदोबस्तामध्ये महिला पोलिसांची संख्या लक्षणीय दिसून आली.


दुपारी बारा वाजेपर्यंत सुमारे तीन लाख भाविकांचे दर्शन झाले होते सर्व बाजूने भाविकांचा येणारा ओघ लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने सोलापूर महामार्ग आणि नळदुर्ग महामार्गावर विशेष वाहतूक यंत्रणा आणि बंदोबस्त यंत्रणात तैनात केलेली दिसून आली. पायी चालत येणाऱ्या भाविकांसाठी तुळजापूर शहरात आल्यानंतर विश्रांती करण्यासाठी जागेची कमतरता दिसून आली. अनेक भाविकांनी दर्शन झाल्यानंतर तास, दोन तास थांबता यावे व जेवण करता यावे अशी जागा तुळजापुरात असली पाहिजे अशी भावना बोलून दाखवली.

तुळजापूर शहरामध्ये थांबण्यासाठी आणि चपला व बॅगा ठेवण्यासाठी लॉकर मोफत असले पाहिजे असे मत कर्नाटकातील  भाविकांनी व्यक्त केले. तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून तिरुपतीच्या धर्तीवर प्रसादाची व्यवस्था करण्यात यावी, भाविक भक्ताच्या सोयीसाठी मंदिर संस्थांकडून सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, आम्ही अनेक वर्षापासून तुळजापुरला येतो परंतु भाविकांच्या सोयीसाठी तुळजापुरात कमतरता असल्याचे महिला भाविकांनी बोलून दाखवले


जिल्हाधिकारी सचिन ओंबासे, जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी यांनी सर्व यात्रेवर नियंत्रण करण्यासाठी लक्ष केंद्रित केले होते. प्रत्येक तासाचा आढावा या दोन अधिकाऱ्याकडून घेतला जात आहे अशी माहिती मिळाली. राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने अभुतपूर्व प्रवासी वाहतूक व्यवस्था करण्यात आली. सुमारे 1,500 बसेस महाराष्ट्र एसटी महामंडळ आणि कर्नाटकातील 500 वेगळ्या गाड्यांची व्यवस्था येथे करण्यात आली होती, 2000 पेक्षा जास्त पोलीस बंदोबस्तासाठी तैनात होते.

तुळजापूर येथील जुने बस स्थानक आणि नवीन बस स्थानक येथून  पायी चालत येणार्‍या भाविकांना  परतीचा प्रवास करण्यासाठी विशेष बस व्यवस्था करण्यात आलेली होती. कर्नाटकातील बाहेर पडणाऱ्या भाविकांना नवीन बस स्थानकामधून सोडण्याची व्यवस्था केली होती. सोलापूरसाठी जुने बसस्थानक येथून व्यवस्था होती. 

सर्वाधिक सोलापूर येथून सुमारे चार साडेचार लाख भाविक दर्शनासाठी आल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. या मार्गावरील सर्व वाहतूक दोन दिवसांपूर्वी बंद करण्यात आली. ही सर्व वाहतूक बायपास मार्गे सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावरून वळवण्यात आल्याचे समजले. त्यामुळे पायी चालत येणाऱ्या भाविकांना यावर्षी कोणताही त्रास जाणवला नाही. त्यांच्या चालत येण्याच्या मार्गावर पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक येथील उद्योगपती व्यापारी यांच्याकडून अन्नछत्र चालविण्यात आले. तेथे सर्व भाविकांनी स्नान आणि पोटभर जेवण करून पुढचा चालण्याचा प्रवास केला सामाजिक भावनेने काम करणारे उद्योगपती मोठ्या संख्येने अन्नदान करीत असल्याचे या ठिकाणी दिसून येत आहे.


 कर्नाटकातील लोकप्रतिनिधी आणि व्यापारी यांचा यामध्ये सर्वाधिक वाटा आहे.
सायंकाळी 5 पासून भाविकांची गर्दी अल्पशी कमी झाल्याचे जाणवले मात्र दर्शन मंडपाचे सर्व मजले भाविकांनी भरलेले होते. घाटशीळ मार्गातील भाविकांना सोडण्याच्या रांगा भरलेल्या होत्या. या रांगा सकाळी 11 वाजता आंबेडकर पुतळ्यापर्यंत आल्या होत्या. सुमारे तीन तास आणि काही वेळेस चार तास अशा फरकाने भाविकांनी दिवसभर दर्शन घेतले. शनिवारी मध्यरात्री आणि रविवारी संपूर्ण दिवस तुळजाभवानी देवीचे दर्शन सुरू ठेवण्यात आले होते. तुळजाभवानी मंदिर संस्थांचे विश्वस्त आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांच्या दर्शनाच्या निमित्ताने विशेष सूचना दिल्या होत्या.
 
Top