मुरुम, ता. उमरगा, दि.०६ : 

साखर उद्योग हा पूर्णपणे शेती व निसर्गावर अवलंबून आहे. सहकारी तत्वावरील साखर कारखानदारी चालविणे व ती टिकविणे सध्या मोठे आव्हान आहे. ज्या हेतूने सहकारी चळवळ यशवंतराव चव्हाणांनी उभी केली. ती शेतकऱ्यांच्या हितासाठी सहकार चळवळ जिवंत ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी पत्रकार परिषदे प्रसंगी व्यक्त केले. 


श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदिपन सोहळा विजयादशमीच्या शुभ मुहूर्ताच्या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बुधवारी (ता. ५) रोजी ते बोलत होते. प्रारंभी जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांच्या शुभहस्ते कारखान्याचा बॉयलर अग्नीप्रदीपन सोहळा संपन्न झाला. 


यावेळी बापूराव पाटील, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरणजी पाटील, विठ्ठलसाईचे व्हाईस चेअरमन सादिकमियाँ काझी, माजी जिल्हा परिषदेचे गटनेते प्रकाश आष्टे, दिलीप भालेराव, रफिक तांबोळी, उमरगा पंचायत समितीचे माजी सभापती मदन पाटील, सचिन पाटील, कारखान्याचे संचालक शरणाप्पा पत्रिके, केशव पवार, विठ्ठल बदोले, विठ्ठल पाटील, अँड.व्ही.एस.आळंगे, राजीव हेबळे, दिलीप पाटील, शिवलिंग माळी, संगमेश्वर घाळे, माणिक राठोड, मल्लीनाथ दंडगे, अँड.विश्वनाथ पत्रिके, माजी नगराध्यक्ष व्यंकटराव जाधव , प्राचार्य डॉ. दिलीप गरुड, डॉ. अशोक सपाटे, रशीद शेख, धनराज मंगरुळे, प्रदीप दिंडेगावे, बबनराव बनसोडे, विकास हराळकर, युसुफ मुल्ला, प्रमोद कुलकर्णी, कारखान्याचे कार्यकारी संचालक एम.बी.अथनी आदिंची प्रमुख उपस्थिती होती.                                 

पुढे बोलताना बसवराज पाटील म्हणाले की, आज जिल्ह्यात केवळ दोनच सहकारी तत्त्वावरील साखर कारखाने चालू आहेत. भविष्यात असे रोजगार निर्माण करणारे उद्योग आपल्या सर्वांना मिळूनच उभे करावे लागणार आहेत. निसर्गाचा लहरीपणा व शासनाची बदलती धोरणे यामुळे साखर उद्योग नेहमी अडचणी आला आहे. अशा प्रतिकुल काळातही हा कारखाना २४ वर्षापासून सर्वांच्या विश्वासाने सामुहिक जबाबदारीने चालवित आहोत. सध्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये एकरी ऊसाचा उतारा वाढविण्यासाठी मोठी स्पर्धा सुरू असून जर शेतकऱ्यांनी शेतीचे नियोजनबध्द मशागत, निगरानी व योग्य ऊस बेण्याची लागवड करुन  जास्तीत-जास्त प्रमाणात ठिंबक सिंचन व मेहनत केल्यास निश्चितच नव्वद ते शंभर टन एकरी उत्पन्न होऊ शकते. परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या नगदी पीकाकडे सकारात्मक मानसिकतेतून पाहण्याची गरज आहे. यंदा ऊसाचे क्षेत्र वाढले असून जोमदार ऊस या पारिसरात देसून येत आहे. यंदाही सहा लाख मेट्रीक टन उद्यिष्टये कारखान्याने ठेवले असल्याचे शेवटी ते म्हणाले. 


याप्रसंगी बापूराव पाटील  म्हणाले, जिल्हा बँकेने देखील जिल्ह्यातील बंद पडलेल्या  सहकारी तत्त्वावरील कारखान्यांना कर्ज पुरवठा करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांसाठी अशा उद्योगांना उर्जित अवस्थेत आणणे ही आपल्या सर्वांची सामुहिक जबाबदारी आहे. विठ्ठलसाई कारखान्याने किल्लारी येथील सहकारी तत्त्वावरील साखर कारखाना एक महाराष्ट्रातील मॉडेल म्हणून भाडेतत्त्वावर घेऊन तो कर्जमुक्त केल्याचे आपल्या सर्वांना माहीत असल्याचे सांगितले. यावेळी विविध संस्था व संघटनांचे पदाधिकारी, ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, कारखान्याचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top