तुळजापूर दि २: डॉ सतीश महामुनी
शारदीय नवरात्र महोत्सवात दररोज तुळजाभवानी मंदिरात नऊ दिवस छबिना मिरवणूक काढली जाते. सहाव्या दिवशी देवीच्या रात्री दहा वाजता निघालेल्या छबिनामध्ये हजारो भाविक भक्तांची उपस्थिती होती.
तुळजाभवानीच्या चांदीच्या प्रतिकात्मक मूर्तीला या मिरवणुकीमध्ये आणले जाते. गरुड वाहनावर निघालेल्या या छबिना मिरवणुकीच्या अगोदर छबिण्याची बांधणी करण्यात आली, तेथे चांदीच्या सिंहासनामध्ये चांदीची भवानी मातेची मूर्ती ठेवुन पूजन करण्यात आले. छत्री आणि अब्दागिरी बाजूला होत्या. या छबिन्यात आराधी गोंधळी आणि विविध लोककलावंत आपली कला सादर करतात तुळजाभवानी देवीचे गोंधळी या छबिण्यासमोर देवीची स्तुती करणारी गाणी गातात. संबळ यावेळी वाजवण्यात येते. आई राजा उदो उदो सदानंदीचा उदो उदो आशा जयघोषात पोत ओवाळून छबिण्याचे दर्शन घेतले जाते. दरम्यान देवीच्या गाभाऱ्यामध्ये महंत तुकोजी महाराज व महंत हमरोजी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये प्रक्षाळ पूजा संपन्न होते.
शहरातील भाविक भक्त आपल्या कलशांमध्ये गोमुख तीर्थाचे पाणी घेऊन येतात .सोबत फुटाण्याचा नैवेद्य दाखवण्यात येतो. या पूजेदरम्यान प्रक्षाळ मंडळाकडून देवीची गाणी म्हटली जातात. त्यानंतर तुळजाभवानीचा गाभारा बंद होतो व संपूर्ण मंदिर परिसर प्रशासनाकडून बंद केले जाते. दोन तासानंतर पुन्हा देवीचे मंदिर उघडले जाते सर्वप्रथम मध्यरात्री एक वाजता चरणतीर्थ पूजा संपन्न होते व देवीच्या दर्शनाला सुरुवात होते.