तुळजापूर, दि. ३ डॉ. सतीश महामुनी
शारदीय नवरात्र महोत्सवातील श्री . तुळजाभवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेश, तेलंगणा या प्रदेशामधून रविवारी लाखो भाविकांनी गर्दी केली होती. दरम्यान धर्मदर्शनातील भाविकांनी सशुल्क दर्शन रांग सकाळी बंद पडली आणि आपला रोष व्यक्त केला. हजारो भाविकांना दर्शन न घेता शिखर दर्शन करून परतीचा प्रवास करावा लागल्याचे दिसुन आले.
अलीकडच्या दहा वर्षात झालेल्या शारदीय नवरात्र महोत्सवातील ही विक्रमी गर्दी असल्याचे जाणकारांनी सांगितले आहे. तुळजापूर शहराच्या 2 किलोमीटर अंतरावर सर्वत्र चार चाकी गाड्या उभ्या राहिलेल्या होत्या तेथून भाविक चालत मंदिराकडे येत होते. लातूर महामार्ग, उस्मानाबाद महामार्ग, सोलापूर महामार्ग आणि नळदुर्ग महामार्ग या सर्व महामार्गावर असणारी वाहन तळे वाहनांनी खचाखच पूर्ण भरली होती. कडेकोट पोलीस बंदोबस्त आणि वाहनांची झालेली कोंडी यामुळे तुळजापूर शहरात भाविकांची मोठी गर्दी असून देखील त्रास झाला नाही. परंतु गर्दीचे प्रमाण जास्त असल्यामुळे दर्शन रांगा जलद गतीने चालवून 3 तास वेळेमध्ये भाविकांना दर्शन देण्यात आले.
कर्नाटकातील एका मंञ्यानी आपल्या पंधरा-वीस वाहनांचा ताफा हजारो भाविकांच्या गर्दीमध्ये घुसवून महाद्वारापर्यंत सर्व गाड्या आणल्यामुळे उपस्थित भाविक भक्तांनी या व्हीआयपी व राजकीय पदाधिकाऱ्याबद्दल आपला रोष व्यक्त केला.
एवढी प्रचंड गर्दी असताना पोलीस प्रशासनाने मंत्र्याच्या या गाड्यांच्या ताफ्याला महाद्वारापर्यंत प्रवेश का दिला ? असा सवाल विचारण्यात येत आहे. तुळजाभवानीच्या दरबारात सामान्य भाविकांना एक व राजकीय पदाधिकारीला वेगळा असा न्याय का सदैव केला जातो. याविषयी दोन तास जोरदार चर्चा होती.
पायी चालत येणारे भाविकांची गर्दी वाढत राहिली रात्रभर भाविक चालत आलेले तुळजापुरात दाखल झाले. मध्यरात्री 2.30 वाजता खूप मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी आसल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीस प्रशासनाने चार चाकी गाड्यांचे वाहनतळ अपसिंगा रोड इतर दूरच्या वाहनतळावर वाहने थांबवण्यासाठी उपाययोजना केली. पहाटे पर्यंत मोठ्या संख्येने भाविकांची पायी चालत येण्याचे प्रमाण कायम राहिले. त्यानंतर देखील मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत होते. एका बाजूने बाहेर पडणाऱ्या भाविकांची गर्दी आणि दुसऱ्या बाजूला दर्शनासाठी मंदिरात जाणाऱ्या भाविकांची गर्दी असे विलक्षण चित्र तुळजाभवानी मंदिर परिसर, भवानी रोड परिसर, बस स्थानक परिसर, शिवाजी चौक परिसर, कमान वेस परिसर आणि शुक्रवार पेठ परिसर या भागात दिसून आले.
तुळजाभवानी देवीच्या अलीकडच्या दहा वर्षातील ही विक्रमी गर्दी मानली जात आहे. एकाच दिवशी सुमारे 7 लाख भाविकांची गर्दी असावी असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सुमारे 2000 पोलीस कर्मचारी नवरात्र काळात बंदोबस्तासाठी तैनात असल्यामुळे या गर्दीवर नियंत्रण करण्यामध्ये प्रशासनाला यश आल्याचे चित्र दिसून येत आहे. परंतु दर्शन करण्यासाठी सर्व भाविकांना तर मंदिरात प्रवेश मिळू शकला नाही. दुपारी दोन नंतर जवळपास सर्व भाविकांनी महाद्वार दर्शन व शिखर दर्शन घेतले आणि परतीचा प्रवास केला महाद्वार चौकामधून प्रसादाच्या आणि कुंकवाची खरेदी केली.
दर्शन मंडपामध्ये भाविकांना गर्मीमुळे मोठा त्रास झाला. अनेक भाविकांना ॲम्बुलन्स मधून उपचारासाठी न्यावे लागले. यादरम्यान भाविकांनी दर्शन मंडपामध्ये खेळती हवा असली पाहिजे, खेळती हवा नसल्यामुळे भाविकांना विशेषतः महिला भाविकांना श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याचे चित्र गर्दीच्या काळात सातत्याने लक्षात येत आहे. याप्रकरणी मंदिर प्रशासनाने वेळेवर खबरदारी घेण्याची सूचना शहरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
अनेक भाविकांनी तुळजापूर खुर्द येथील तुळजाभवानी देवीच्या मंदिरामध्ये भवानी मातेचे दर्शन घेतले. उपजिल्हाधिकारी योगेश खरमाटे तहसीलदार सौदागर तांदळे, मंदिर व्यवस्थापक तहसीलदार सौ.योगीता कोल्हे, जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे, धार्मिक व्यवस्थापक विश्वास कदम , नगरपालिकेचे मुख्याधिकारी अरविंद नातू आदी प्रशासनातील मंडळी या गर्दीच्या परिस्थितीवर नियंत्रण करण्यासाठी जातीने हजर होते.
यागर्दी संदर्भात तुळजाभवानी देवीची पुजारी गोरक्षनाथ पवार आणि देवीची पुजारी महेश चोपदार यांनी सांगितले की, नवरात्र काळात आज असणारी गर्दी विक्रमी गर्दी असून तुळजाभवानी देवीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी किती मोठी तयारी करणे गरजेचे आहे हे आजच्या गर्दीवरून लक्षात येते. वेगवेगळ्या पातळीवर भाविकांना सुविधा देण्याची गरज आजच्या दिवशी समोर आली आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे
तुळजाभवानी मंदिर संस्थान तीनशे रुपये व पाचशे रुपये अशा वेगवेगळ्या सेवा देते परंतु धर्मदर्शन करणाऱ्या सामान्य भाविकांनी सकाळी असे सशुल्क दर्शन घेणाऱ्या भाविकांना रोखून सशुल्क दर्शनाची रांग बंद पडली, परिणामी प्रशासनाने सायंकाळी चार वाजेपर्यंत सशुल्क दर्शन मिळणार नाही असे जाहीर केले. मिळालेल्या माहितीनुसार दुपारी तीन वाजता घाटशिळ रोड येथील प्रवेशद्वारा मधून तीनशे रुपये सशुल्क दर्शन सुरू केल्याची बातमी समजली.
मंदिर संस्थांनी सशुल्क दर्शन बंद केल्यामुळे व्हीआयपी आणि उच्चपदस्थ अधिकारी यांच्या कुटुंबीयांना दर्शन घेता आले नाही, सशुल्क दर्शन हे तुळजाभवानी मंदिरात कायम अडचणीची आणि वादग्रस्त व्यवस्था ठरली आहे. या व्यवस्थेविरोधात सामान्य भाविकांमध्ये संतापाची लाट आहे. परंतु यासंदर्भात जाहीरपणे कोणी बोललेले नसल्यामुळे सशुल्क दर्शन सुरू आहे.