तुळजापूर, दि. 20 :
तुळजापूर तालुक्यात अतीवृष्टी झाल्यामुळे मागील दीड महिन्यापासून शेतकऱ्याच्या रानामध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. दररोज पाऊस पडत असल्यामुळे सर्वच्या सर्व पीक वाया गेले आहे. अशा परिस्थितीत ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 75 हजार रुपये अनुदान देण्याची मागणी काँग्रेसचे सेवादलाचे तालुकाध्यक्ष तानाजी जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.
इतिहासामध्ये पडला नाही एवढा पाऊस मागील दीड महिन्यामध्ये तुळजापूर तालुक्यात पडला आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. शेतकऱ्यावर आलेल्या आर्थिक संकटाची परिस्थिती दूर करण्यासाठी सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी काँग्रेस सेवा दलाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दिवाळी सणाच्या तोंडावर शेतकरी अत्यंत संकटात आहे. शासन जी मदत करत आहे ती अत्यंत कमी असून तरी एक लाख रुपये मदत केल्याशिवाय चालू हंगामातले नुकसान भरून येणार नाही आणि पुढील हंगामाची तयारी करण्यासाठी शेतकऱ्याजवळ काहीही नसल्यामुळे मदत केल्याशिवाय शेतकऱ्याजवळ पर्याय राहिलेला नाही. अशी वाईट परिस्थिती शेतकऱ्यावर आली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी यापूर्वी हेक्टरी 75 हजार रुपये आर्थिक मदत मागितलेली आहे. शेतकऱ्याला पुढील हंगामामध्ये मदत करण्याच्या अनुषंगाने सरकारने तातडीची पावले उचलावीत आणि ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी या निवेदनामध्ये करण्यात आली आहे. या निवेदनावर तालुकाध्यक्ष तानाजी जाधव, सरपंच संजय गुंजुटे, तालुका उपाध्यक्ष नूर खा सौदागर, विकास हावळे, बब्रुवान पारवे, गोविंद कदम, त्यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.