तुळजापूर, दि. ६ :डॉ सतीश महामुनी
श्री. तुळजाभवानी देवीचे सीमोल्लंघन हजारो भाविकांच्या उपस्थितीत आणि तेजस्वी कुंकवाची उधळण करत पहाटे साडेपाच वाजता सीमोल्लंघन साजरे झाले, भिंगार येथील पलंग पालखीचे पहाटे चार वाजता तुळजाभवानी मंदिरात आगमन झाले.
भिंगार जिल्हा नगर येथून आलेल्या मानाच्या पलंग पालखीचे तुळजापुरात सायंकाळी सात वाजता शुक्रवार पेठ भागात आगमन झाले. परंपरागत मार्गाने ही पलंग पालखी पायी चालत आली आई राजा उदो उदो सदानंदीचा उदो उदो जय घोषात अहमदनगर जिल्ह्यातील हजारो देवीचे भक्त पलंग पालखी यात्रेमध्ये सहभागी झाले होते. याच पलंग पालखीमध्ये पहाटे पाच वाजता तुळजाभवानीचे मुख्य मूर्ती विराजमान करण्यात आली. तत्पूर्वी मध्यरात्री एक वाजता तुळजाभवानी देवीचे सीमोल्लंघन सोहळ्याची पूर्वतयारी तुळजाभवानी मंदिर संस्थान आणि पुजारी बांधवाकडून सुरू करण्यात आली. देवीला 108 साड्यांचे दिंड गुंडाळण्यात आले. तुळजाभवानी देवीची मूर्ती मुख्य सिंहासनावरून उचलून ती अहमदनगर जिल्ह्यातून आलेल्या मानाच्या पालखीमध्ये बसवण्यात आली. त्यानंतर पालखी मधून तुळजाभवानी देवीच्या मंदिरात प्रदक्षिणा पूर्ण झाली. यादरम्यान हजारो भाविक भक्त तुळजाभवानी मंदिरात उपस्थित होते.
तुळजाभवानी देवीचे सीमोल्लंघन हा अत्यंत रोमांचकारी धार्मिक विधी आहे. जल्लोषात वाजत गाजत संबळाचा निनाद, कुंकवाचे उधळण करत या मिरवणुकीमध्ये अहमदनगर येथुन आलेल्या व तुळजापूर येथील पुजारी बांधवांनी सीमोल्लंघन पूर्ण केले. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ़ सचिन ओंबासे, आमदार राणा जगजीतसिंग पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष सौ अर्चनाताई पाटील, महंत तुकोजी महाराज, महंत हमरोजी महाराज, उपजिल्हाधिकारी योगेश खरमाटे तहसीलदार सौदागर तांदळे, मंदिर तहसीलदार सौ योगिता कोल्हे, धार्मिक व्यवस्थापक विश्वास कदम, जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे, पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जन साळुंखे, भोपे पुजारी मंडळ अध्यक्ष अमरराजे कदम ,उपाध्ये पुजारी मंडळ अध्यक्ष अनंत कोंडो, यांच्यासह इतर मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. पोलीस प्रशासनाच्या वतीने योग्य ते खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या.