काटी, दि. १२: उमाजी गायकवाड

वीज पडून मसला (खुर्द) ता. तुळजापूर येथे एका गायीचा मृत्यू झाला  तर खुंटेवाडीत विद्युत तारेचा शॉक लागल्याने एका गायीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

 तुळजापूर तालुक्यात मंगळवार दि.11 रोजी अनेक ठिकाणी दुपारनंतर  जोरदार पावसाने हजेरी लावली होती.या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे बघायला मिळाले. आधीच्याच पावसाने शेतांमध्ये पाणी साचून तळे साचल्याने सोयाबीन पिक सडू लागली  असताना मंगळवारी  दुपारनंतर सुरु झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची धांदल उडाली. 


विजेच्या गडगडाटासह झालेल्या पावसामुळे तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द येथील शेतकरी गजेंद्र बळीराम शिंदे यांच्या गिर जातीच्या गायीवर  वीज पडून दुधाळी गिर गायीचा मृत्यू झाला. तलाठी निलेश काशिद यांनी प्रत्येक्ष घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला असून पंचनाम्यात 50 हजारांचे नुकसान झाल्याचे नमूद केले आहे. तर तुळजापूर तालुक्यातील खुंटेवाडी येथील शेतकरी धनाजी भिवाजी जाधव यांच्या शेतातील विद्युत तारा खाली आल्याने बुधवार दि.12 रोजी सकाळी विद्युत तारेला स्पर्श झाल्याने विद्युत तारेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. या ठिकाणी तलाठी  प्रशांत गुळवे यांनी प्रत्येक्ष घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला असून या  पंचनाम्यात 90 हजारांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. आधीच पावसामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांचे पशुधन गेल्याने त्यांना झालेली नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.
 
Top