काटी,दि.१८ 

तुळजापूर तालुक्यातील चव्हाणवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 14 विद्यार्थ्यांनी  शिष्यवृत्ती परीक्षेतील देदीप्यमान यशाची परंपरा कायम ठेवत इयत्ता पाचवीच्या 11 व इयत्ता आठवीच्या 3 अशा एकूण 14 विद्यार्थ्यांनी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. या विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा येथील शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ, पालक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शाळेत गटशिक्षणाधिकारी मल्हारी माने यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या  हस्ते शुक्रवारी सायंकाळी सत्कार करण्यात आला़.


महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागातर्फे या शिष्यवृत्ती परीक्षांचे आयोजन करण्यात येते. बौद्धिक क्षमतांची कसोटी पाहणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता पाचवीतील 11, तर इयत्ता आठवीतील 3 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले होते. जुलै 2022 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी इयत्ता पाचवीतील 
कु.श्रीवणी सुरडे कु.श्रावणी खलाटे,श्रेयस चव्हाण,समृध्दी गायकवाड,कार्तिकी सुरडे, समृध्दी नवगिरे,श्रीहरी चव्हाण, करिश्मा शिंदे, श्रवण चव्हाण, श्रध्दा माळी, श्रेया सुरडे यांचा तर इयत्ता आठवीतील सापते मुक्ता, पांचाळ भक्ती,  खलाटे अक्षता या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला तर शाळेचे मुख्याध्यापक शेखु जेटीथोर सहशिक्षक बलभीम भोयटे श्रीमती सुषमा देशमुख,अशोक जेटीथोर, गीताश्री पाटील,सुखदेव भालेकर या मार्गदर्शक शिक्षकांचाही सत्कार करुन सन्मान करण्यात आला. 

गटशिक्षणाधिकारी पदावर पदोन्नती झालेबद्दल माने यांचा सत्कार

मंगरूळ बीटमधील विस्तार अधिकारी मल्हारी माने यांची गटशिक्षणाधिकारी पदावर पदोन्नती झालेबद्दल येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.


यावेळी सत्कार प्रसंगी  बोलताना गटशिक्षणाधिकारी मल्हारी माने म्हणाले की, शिक्षकांच्या विचारातील सकारात्मकता, आशावाद, विद्यार्थ्यांना जगण्याचे बळ देत असतो.भविष्यात चांगले विद्यार्थी घडवयाचे असतील तर  शिक्षकांना विद्यार्थी घडविण्याची, उत्तुंगतेची आस असली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या जीवनाकडे बघण्याचा दुर्दम्य अशावाद असला पाहिजे. शिक्षकांसाठी रोजचा दिवस हा शिक्षक दिन असला पाहिजे असे मत व्यक्त करुन शिक्षकांनी हार्डवर्क करण्याऐवजी स्मार्ट वर्क करण्यास  प्राधान्य देऊन विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरापर्यंत नेण्यासाठी परीक्षेची पूर्वतयारी  करावी लागणार असून या कामात पालकांनी देखील तितकंच सजग राहून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या सवयींचे निरीक्षण करणे,पालक म्हणून आपला मुलगा किंवा मुलगी दिवसातून किती वेळ आणि कशाप्रकारे अभ्यास करते, पाल्य कोणत्या तणावाखाली आहे का? याकडे देखील पालकांना जाणीवपूर्वक लक्ष  द्यावे लागणार आहे.तरच चांगले विद्यार्थी घडविले जाऊ शकतात असे मत व्यक्त केले.


यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नाना सुरडे उपाध्यक्ष राम सुरडे,सरपंच श्रीमती अनिता गोकुळे, उपसरपंच तुकाराम चव्हाण, पोलीस पाटील शञुघ्न चव्हाण,तंटामुक्तीचे अध्यक्ष यशवंत चव्हाण केंद्र प्रमुख संजय वाले, मुख्याध्यापक शेखू जेटीथोर,सहशिक्षक बलभीम भोयटे,सुषमा देशमुख,गीताश्री पाटील, अशोक जेटीथोर, सुखदेव भालेकर,   शिवाजी शिंदे, भिमा  शिंदे यांच्यासह शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य,विद्यार्थी,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top