तुळजापूर,दि. १८ :उमाजी गायकवाड


नुकतेच महाराष्ट्र मराठा सोयरीकच्या वतीने राज्यव्यापी विनाशुल्क वधु वर परिचय मेळावा संभाजीनगर (औरंगाबाद) येथे  संपन्न झाला. 


प्रारंभी व्यासपीठावर  पालकमंत्री संदिपान भुमरे, उद्योगपती भाऊसाहेब काळे,महाराष्ट्र मराठा सोयरीकचे संस्थापक सुनिल जवंजाळ-पाटील,हिवाळे पाटील, डॉ.पी.पी.पाटील, शिक्षणाधिकारी,ॲड.सौ कडू आदी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन प्रारंभ करण्यात आला.



या मेळाव्यामध्ये विदर्भ,खान्देश, मराठवाडा त्याच बरोबर पश्चिम महाराष्ट्रातील वधु-वर व पालकांची  उपस्थिती  होती. मेळाव्यामध्ये सुप्रसिद्ध उद्योजक भाऊसाहेब काळे यांचे वतीने आलेल्या सर्व विवाहच्छुक वधुवर व पालकांसाठी मोफत भोजन व्यवस्था करण्यात आली . तसेच हिवाळे पाटील लॉन्स हे हिवाळे पाटलांनी विना शुल्क उपलब्ध करून दिले होते. मराठा सोयरिकचे संस्थापक सुनिल जवंजाळ पाटील (बुलढाणा) यांच्या संकल्पनेतून लोकसहभागातून महाराष्ट्रभर आजपर्यंत  29 मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहेत. 

संभाजीनगर येथील या राज्यस्तरीय नियोजित मोफत सामुहिक वधुवर मेळाव्यातून 450 वधूनी तर 700 वरांनी आपला परिचय करून करुन देत आपला जीवनसाथी कसा असावा, त्याबाबत अपेक्षा व्यक्त केल्या. या मेळाव्यातून विवाहच्छुक वधूंनी शेतकरी वरांना पसंती न देता उच्चशिक्षित तरुणांना पसंती दिल्याचे दिसून आले. एकंदरीत "शेतकरी नवरा नको गं बाई" हेच चित्र दिसून आले.


 पालकमंत्री संदीपानजी भुमरे यांनी पैठणला लवकरच मेळावा घेण्याचे व मेळाव्यास लागणाऱ्या सर्व सुविधा आपण स्वतः पुरविणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी आयोजन समितीला दिले. त्याचबरोबर  भाऊसाहेब काळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलतांना लवकरच औरंगाबाद येथे सामुहीक विवाह सोहळा आयोजित करण्याचे अभिवचन दिले. त्याचबरोबर कन्नड येथील पोपटराव सपकाळ पाटील यांनीही कन्नड येथे पुढील महिन्यात मेळावा घेण्याची घोषणा केली.  पोपटराव सपकाळ यांना महाराष्ट्र मराठा सोयरीकच्या वतीने पालकमंत्री संदीपान भुमरे यांचे हस्ते मराठवाडा भुषण पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले. तर प्रा. जगदेव बाहेकर यांनी लवकरच बुलढाण्यात मेळावा घेण्याची घोषणा केली. सर्व उपस्थित मान्यवरांचा आयोजन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. 



यावेळी मेळाव्यास संबोधित करताना मराठा सोयरिक ग्रृपचे संस्थापक अध्यक्ष सुनिल जवंजाळ-पाटील  म्हणाले की, महाराष्ट्रभर मराठा सोयरिक ग्रुपच्या माध्यमातून  राबविण्यात येत असलेल्या सामुहिक विवाह सोहळ्यामुळे धंदेवाईक विवाह संस्थेला चांगलाच चाप बसल्याचे सांगत आजपर्यंत महाराष्ट्रभर विनाशुल्क भोजन व्यवस्थेसह 29 मेळावे घेतल्याची माहिती दिली. तसेच सध्या चोहीकडे स्त्र‌ी जन्मदर घटला आहे. प्रत्येक पुरुषाला लग्नाकरिता स्त्री हवी असते. मात्र आपल्या पोटी मुलगी जन्माला यावी,अशी इच्छा कोणाचीच नसते. बायको हवी पण मुलगी नको, ही मानसिकता सोडण्याची गरज असून स्त्री जन्मदर घटल्याने अनेक तरुण वधूच्या शोधात फिरत असताना चित्र दिसून येत आहे. अनेक तरुण मुले गावोगावी लग्नापासून वंचित राहत असल्याचे भयान चित्र  समोर येत आहे. त्यामुळे महाराष्ट्राभर मोफत सामुहिक वधुवर सुचक मेळाव्याचे आयोजन करण्याची गरज व सर्वोत्तम उपाय असून धंदेवाईक विवाह संस्थेला आळा घालण्यासाठी ती काळाची गरज झाली आहे,असे प्रतिपादन  जवंजाळ-पाटील यांनी केले. 

कार्यक्रमाचे सुत्र संचालन  अंकुशराव मनगटे व श्री. गायकवाड  यांनी केले तर आभार  सौ.प्रतिभा जगताप यांनी मानले. 

मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी पोपट सपकाळ,ज्ञानेश्वर अंभोरे गुरुजी, प्रभाकर गायकवाड,धनुश्री अंकुशराव मनगटे,मनोहर वडजे,राम झांजे,कैलास बरडे,नंदीची जवंजाळ आदींनी पुढाकार घेतले.

 
Top