काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बुधवारी (दि. ३०) माघारीच्या अंतिम दिवशी 20 उमेदवारी अर्जांपैकी 7 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने 13 जागांपैकी 4 जागा बिनविरोध आल्या असून सोसायटीच्या राहिलेल्या 9 जागांसाठी 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद आर. कुलकर्णी यांनी दिली.
काटी विकास सोसायटीसाठी अर्ज छाननीपुर्वी भटक्या विमुक्त जाती जमाती मधून कॉंग्रेसचे भारत राजाराम आगलावे, महिला राखीव मधून कॉंग्रेसच्या आशा मधुकर साळुंके,तर महिला राखीव मधून दुसऱ्या चंपाबाई खेला पुजारी हे उमेदवार बिनविरोध आले होते. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वसाधारण गटातील प्रदीप श्रीरंग साळुंके, राजेंद्र रामहरी गाटे,जयाजी विजयसिंह देशमुख, धनाजी अण्णासाहेब देशमुख, नाशेर अहमद अ.नईम काझी, वसंत लक्ष्मण हेडे यांनी तर सर्वसाधारण गटातील नाबाजी गोरख ढगे या 7 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने इतर मागासवर्गीय गटातील भाजपचे धनाजी दत्तू ढगे हे बिनविरोध निवड आले आहेत.
येथील सोसायटीच्या निवडणुकीसाठी 11 डिसेंबरला दोन वेगवेगळ्या बॅलेट पेपरद्वारे मतदान होत असून गुरुवारी सकाळी अकरा वाजता कपबशी, बॅट,विमान, सिलिंग फॅन,छत्री या निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले.तर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. सोसायटी आणि ग्रामपंचायतसाठी सक्षम उमेदवार निवडण्यापासून निवडणुकीतील मोर्चेबांधणीसाठी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक झाल्याचे दिसून आले. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमुळे सोसायटीची निवडणूक बिनविरोध काढण्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत प्रयत्न केले परंतु हे सर्व प्रयत्न असफल ठरले.
निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, सरपंच आदेश कोळी,बाजार समितीचे माजी संचालक सुजित हंगरगेकर, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, राष्ट्रवादीचे पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, मकरंद देशमुख करीम बेग,चंद्रकांत काटे, प्रदीप साळुंके आदी स्थानिक गावपुढाऱ्यांनी प्रयत्न केला. मात्र तो प्रयत्न उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अखेर फोल ठरला. बुधवारी (दि. ३०) माघारीच्या दिवशी 20 पैकी 7 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने आता 9 जागांसाठी 13 उमेदवार समोरासमोर उभे ठाकले आहेत.
गटनिहाय उमेदवार पुढीलप्रमाणे - (सर्वसाधारण गट)
1)अविनाश हणमंत देशमुख 2)रामलिंग उद्धव जाधव (खुंटेवाडी)
3) सयाजीराव विजयसिंह देशमुख
4)नजीब खलील काझी 5)अभिमान भागवत बामणकर
6) राजु सिध्दलिंग वाडकर
7)हरि नागू जाधव (खुंटेवाडी) 8)संजय रामचंद्र साळुंके 9)काकासाहेब गणपती वीर 10)प्रकाश दत्तु गाटे
11) बाबुराव मारुती ढगे
अनुसूचित जाती जमाती गटातून-
1)अशोक आगतराव जाधव
2) सुभाष पांडुरंग गायकवाड
याप्रमाणे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
काटी विकास सोसायटीच्या 9 जागांसाठी रविवारी 11 डिसेंबर 2022 रोजी मतदान घेण्यात येऊन, त्याच दिवशी मतमोजणी करण्यात येणार आहे. भाजप, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पॅनलमध्ये होणाऱ्या या चुरशीच्या लढतीकडे संपूर्ण गावासह तालुक्याचे लक्ष लागून आहे. ऐन थंडीच्या दिवसात सोसायटी आणि ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे तर स्थानिक पदाधिकाऱ्यांची प्रतिष्ठा चांगलीच पणाला लागली असून गावात राजकीय वातावरण तापले आहे.