उमरगा, दि. ०६ : लक्ष्मण पवार

उपदेशाचे स्वरूप न बदलू देता मार्गदर्शन करणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन हभप. ज्ञानसिंधू चैतन्य महाराज देगलूरकर पंढरपूर यांनी केले. 

ते अचलबेट देवस्थान येथे दत्त जयंती निमित्त आयोजित किर्तन सेवेत मंगळावर दि. ६ रोजी बोलत होते. यावेळी हभप. देगलूरकर महाराज बोलताना म्हणाले की, उपदेश करण्यासाठी जगदगुरु संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज या सर्वांनी चांगले उपदेश केले. पुढे हभप. चैतन्य महाराजांनी 

देह नव्हे मी सरे
उरला उरे विठ्ठल || १ ||

म्हणऊनि लाहो करा
काळ सारा चिंतने || धृ ||

पाळणाची नाहीं चिंता 
ठाव रिता देवाचा  || २ ||

तुका म्हणे जिवासाठी
देव पोटीं पडेल  || ३ ||

या अभंगाद्वारे संत महात्म्यांनी केवळ उपदेश करावे देवाने उपदेश करू नये. भगवान भक्तांचे रक्षण करण्यासाठी अवताराला येतोय. ज्ञानोबारायाने माता समवेत उपदेश केल्याने सर्वांच्या मनोकामना पुर्ण होतात. जिवन जगताना अभ्यास करणे आवश्यक आहे. मरणानंतर पुढील जन्मात पुढील शिल्लक राहिलेला अभ्यास चालू होतो. असे म्हणून जीवनाचे रहस्य सविस्तर उलगडले. 

शेवटी बोलताना सांगितले की, लाख गोष्टी बाजूला ठेवा अगोदर दान करा नंतर अंघोळ करा. कोट्यवधी गोष्टी बाजूला ठेवा ज्ञानार्जन करावे असे म्हणून रामराम स्मरा असे म्हणाले. शेवटी अचलबेट देवस्थान च्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्रीगुरू दिनदर्शिकेचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. 

यावेळी किर्तन सेवा यशस्वीतेसाठी हभप. हरी गुरूजी लवटे महाराज,हभप.महेश महाराज त्यांच्या समवेत अचलबेट देवस्थान भक्त परिवार व सेवेकरी मंडळींनी पुढाकार घेतला होता.

 
Top