ताज्या घडामोडी


काटी , दि. ०५ : उमाजी गायकवाड


पारधी समाज बांधवांना समाजातील मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पारधी समाज बांधव आणि पोलीस यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून रविवार दि.4 रोजी ज्येष्ठ साहित्यिक तथा सामाजिक कार्यकर्ते नामदेव भोसले व तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांनी तुळजापूर तालुक्यातील वडगाव (काटी) पारधी पेडीला भेट देऊन पारधी समाजातील रुढी आणि परंपरांच्या जोखडातून बाहेर काढण्यासाठी त्यांच्यात समाज प्रबोधन करित पारधी समाजाच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.
    

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक नामदेव भोसले यांनी पारधी समाजाच्या व्यथा सांगताना म्हणाले की,पारधी समाज हा अत्यंत मागासलेला व वंचित समाज आहे. शिक्षणाचे प्रमाण हे अत्यंत तुरळक असल्या कारणाने या समाजाची प्रगती होत नाही.  या समाजात शिक्षण नसल्यामुळे व गरिबीमुळे हा समाज विकासापासुन कोसो दुर राहिलेला आहे. पारधी समाजातील बहुतांशी लोकांना राहायला जागा नाही, घर नाही, उद्योगधंद्याची साधने नाहीत, नोकर्‍या नाहीत,जातीची दाखले, रेशन कार्ड,रहिवाशी दाखला नसल्या कारणामुळे त्यांना अनेक हालअपेष्टांना सामोरे जावे लागते. या समाजातील लोकांना त्यांच्यासाठी असणार्‍या शासकीय योजनांची माहिती मिळत नाही. कारण, त्यांच्या पर्यंत या योजना पोहचत नाहीत आणि हे पारधी लोक ही तिथपर्यंत पोहचत नाहीत. पर्यायाने हा पारधी समाज गुन्हेगारीकडे वळल्याने गुन्हेगारीचा ठपका त्यांच्यावर बसल्याचे दिसून येते.


 त्यामुळेच या सर्व गोष्टींवर चर्चा होण्यासाठी व त्यांच्यासाठी असणार्‍या योजनांची माहिती पारधी समाजाला मिळावी त्या अनुषंगाने प्रयत्न करुन 
पारधी समाजाचे विविध प्रश्न शासनासमोर मांडुन ते प्रश्न सोडवणे गरजेचे असून या पारधी आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलीस प्रशासनाने सहकार्य करण्याची मोठी गरज असल्याचे मत व्यक्त केले. यानंतर तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांनी उपस्थित  पारधी समाज बांधवांसोबत चर्चा करून त्यांना येणाऱ्या अडीअडचणीसाठी पोलीस प्रशासन वेळोवेळी सहकार्य करेल असे आश्वासन दिले. कार्यक्रमानंतर तामलवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने  पारधी समाज बांधवांच्या मुलांना खाऊचे वाटप केले . 


यावेळी तामलवाडी  पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित, जेष्ठ साहित्यिक तथा सामाजिक कार्यकर्ते नामदेव भोसले,वडगावचे सरपंच गौरीशंकर कोडगिरे आणि तामलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस ठाणे अंमलदार शिवाजी शिरसाट,तुराब शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

 
Top