काटी,दि. ०८ :उमाजी गायकवाड
आपल्या बँक खात्यावर मस्सा ता.कळंब येथील एक गरीब शेतकरी आश्रुबा नवनाथ थोरात यांचेकडून महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेतून 11 नोव्हेंबर 2022 रोजी चुकून खाते क्रमांकावरील एक अंक चुकीचा पडल्याने आलेले 53 हजार रुपये तुळजापूर तालुक्यातील काटी येथील गावोगावी जाऊन भंगारचा व्यवसाय करणाऱ्या तौफिक पैगंबर सय्यद तरुणाने प्रामाणिकपणे शनिवार (दि.7 ) रोजी परत केले. खात्यात अचानक पैसे आल्याचे पाहून त्यांने बॅंकेत जाऊन चौकशी केली. परंतु त्यास पैसे कोठून व कोणाकडून आले याची माहिती मिळू शकली नाही.अर्थात आश्रुबा थोरात यांना पण काही दिवस आपले पैसे दुसऱ्या खात्यात जमा झाल्याची माहिती नव्हती. बॅंकेत गेल्यानंतर पैसे चुकून काटी येथील तौफिक सय्यद यांच्या खात्यात ट्रान्स्फर झाल्याचे लक्षात येताच थोरात यांनी तात्काळ स्थानिक पत्रकार रसुल तांबोळी यांना याची माहिती दिली. पत्रकार तांबोळी यांनी दुरध्वनीवरुन काटीतील दैनिक पुण्यनगरीचे प्रतिनिधी उमाजी गायकवाड यांच्याशी संपर्क साधून झालेल्या प्रकाराची माहिती दिली. पत्रकार उमाजी गायकवाड यांनी अहमद पठाण,करीम बेग,अन्नु पठाण, ज्योतिराम चवळे यांना सोबत घेऊन तौफिक सय्यद यांच्याशी संपर्क केला असता तौफिक यांनी अजिबात विचार न करता प्रामाणिकपणे त्यांना हे चुकून आलेले 53 हजार रुपये परत करण्याचा शब्द दिला. मुलगा आजारी असल्याने व रुग्णालयात ॲडमिट असल्यामुळे दहा ते पंधरा दिवस लागतील असे सांगितले. तौफिक याचे वडील पैगंबर सय्यद हे देखील मजुरीचे काम करतात.
शब्द दिल्याप्रमाणे काटी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत तौफिक पैगंबर सय्यद या युवकाने आश्रुबा नवनाथ थोरात मस्सा ता.कळंब यांच्या या खात्यावर ऑनलाइन पद्धतीने आलेले 53 हजार रुपये पुन्हा मुळ मालकाच्या नावावर ट्रान्स्फर केले.आश्रुबा थोरात यांनी शनिवारी मस्सा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत जाऊन तेथील शाखा व्यवस्थापकाकडून खात्यावर 53 हजार रुपये आल्याची खात्री करून घेतली. त्यावेळी शेतकरी थोरात यांच्या चेहऱ्यावर समाधान झाल्याची भावना त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलून दाखवली. तौफिक सय्यद यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मीही स्वतः भंगारचा व्यवसाय करतो त्यामुळे कष्टातून मिळवलेल्या पैशाची किंमत मला माहित आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून गरीब शेतकऱ्याचे पैसे परत करायचा निर्णय घेतला आणि ते माझे कर्तव्य आहे.
तौफिक सय्यद
काटी ता.तुळजापूर
आजच्या कलयुगात इमानदारी आणि माणुसकी अजूनही जिवंत आहे. यांचे मूर्तिमंत उदाहरणं म्हणजे काटी येथील भंगारचा व्यवसाय करणाऱ्या तौफिक सय्यद असल्याची भावना व्यक्त करीत असे प्रामाणिक लोक समाजात कमी सापडतात. पैसे परत केल्यामुळे आम्ही समाधानी आहोत.
सतीश हरिदास वरपे
प्रगतशील शेतकरी
मस्सा. ता. कळंब