मंगरूळ , दि. ०९
वात्सल्य सामाजिक संस्थेच्या माध्यमातून चालणारे सर्व उपक्रम हे आदर्शवत आहेत असे गौरवोद्गार धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी यांनी काढले. संस्थेच्या माध्यमातून श्रीगणेश मंदिर उभारणीचा भूमिपूजन सोहळा श्री.कुलकर्णी यांच्या हस्ते झाला, यावेळी ते बोलत होते.
प्रारंभी श्री.कुलकर्णी यांचे औक्षण करून,तुळशीची माळ घालून व दासबोध ग्रंथ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी संस्थेच्या माध्यमातून मंगरूळ ता. तुळजापूर येथील केंद्रात दुर्मिळ वनौषधी,देशी वृक्ष यांची लागवड व संवर्धनाचे केलेले काम श्री.कुलकर्णी यांनी आस्थेवाईकपणाने पाहिले व या चळवळीत संस्थेच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले.
श्री.कुलकर्णी हे जिल्हा पोलीस अधीक्षक ही जबाबदारी सक्षमपणे पेलण्यासोबत वृक्षप्रेमी, सेंद्रिय शेती त्यासोबतच समाजातील वंचित घटकांसाठी काम करणारे संवेदनशील मनाचे अधिकारी अशी त्यांची ओळख आहे.
संस्थेच्या माध्यमातून चालणारी गोशाळा ,एकल भगिनी मधील काम,प्रशिक्षण केंद्रे,ॲम्ब्यूलन्स च्या माध्यमातून चालणारी आरोग्य सेवा यांची त्यांनी माहिती घेतली.समाजातील सुह्रदयी व्यक्तींच्या योगदानातून संस्थेच्या परिसरात श्रीगणेश मंदिर उभारले जात आहे.आजच्या धकाधकीच्या जीवनात संस्थेत येणाऱ्या घटकांना अध्यात्मिक शांती मिळावी हा या मागचा हेतू आहे.
याप्रसंगी तामलवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.रमेश घुले,गुन्हे शाखेचे श्री.आकाश सुरणार,संस्थेचे पदाधिकारी-कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.