काटी, दि.२९ : उमाजी गायकवाड 

मंगळवार दि. 28 रोजी  तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलीस ठाण्याचे  सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन अशोकराव पंडीत यांची बदली धाराशिव येथील सायबर सेल विभागामध्ये झालेबद्दल तामलवाडी पोलीस ठाण्याअंतर्गत गावातील पोलीस पाटील, पोलीस कर्मचारी, नागरिकांच्या वतीने आयोजित  निरोप समारंभ व त्यांच्या ठिकाणी नुतन सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशिलकुमार चव्हाण यांचा स्वागत समारंभ मंगळवारी सायंकाळी तामलवाडी पोलीस ठाण्यात पार पडला. 


या निरोप व सत्कार समारंभात तामलवाडी पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील 27 गावातील सर्वस्तरातील नागरिकांनी आपली उपस्थिती लावली होती. एखाद्या पोलिस अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर पोलीस पाटील,सर्वसामान्य जनता आणि कर्मचारी मिळून अशाप्रकारे  निरोप देण्याचा कार्यक्रम पहिल्यांदाच संपन्न झाला.  

मागील गेली दोन वर्षापुर्वी सपोनि सचिन पंडित  यांनी  तामलवाडी पोलीस स्टेशनमध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षकपदी कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी म्हणून चोखपणे  कारभार पहिला. 

तामलवाडीसह परिसरातील सर्वसामान्यांच्या समस्या व प्रश्नांची जाण ठेवण्या बरोबरच कार्यक्षेत्रातील गुन्हेगारीला आळा घालण्याबरोबरच  कायदा सुव्यवस्था चोख हाताळली. याच त्यांच्या कार्य पद्धतीमुळे त्यांची अभ्यासू, दबंग, कर्तव्यदक्ष,  संवेदनशील पोलिस अधिकारी म्हणून वेगळी ओळख निर्माण झाली होती. त्यांची नुकतीच धाराशिव येथे सायबर सेल विभागात बदली झाली. या निमित्ताने तामलवाडी पोलीस स्टेशनच्या ठाण्याच्या आवारात भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व अधिकारी, कर्मचारी, पोलीस पाटील व नागरिक भावुक झाले होते.  ‘पोलिस हाच जनतेचा खरा मित्र’ ही संकल्पना त्यांनी आपल्या कृतीतून राबविली. “आध्यत्मिक विचारसरणी” व “पोलिसातील माणूस” यामुळे नागरिकांबरोबरच सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्‍यांमध्ये ते लोकप्रिय ठरले. 


त्यांच्या कार्य-कर्तृत्वाचा गुण गौरव करतांना अनेकांचा कंठ दाटून आला होता. नागरिकांनी त्यांच्या प्रति व्यक्त केलेले प्रेम म्हणजे त्यांनी केलेल्या  सेवेची पावतीच म्हणावी लागेल.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांचा निरोप तर  नुतन सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशिलकुमार चव्हाण यांचा सत्कार सोहळ्याप्रसंगी तामलवाडी पोलीस ठाण्याअंतर्गत 27 गावातील पोलीस पाटील, राजकीय पदाधिकारी, नागरिक, पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य यशवंत अण्णा लोंढे, हनुमंत गवळी, डॉ. रविकांत गुरव, डॉ. रवीराज गायकवाड, सुनिल गवळी, पोलीस उपनिरीक्षक रमेश घुले, तामलवाडीचे माजी सरपंच ज्ञानेश्वर माळी,सुधीर पाटील, सावरगाव येथील माजी  सरपंच रामेश्वर तोडकरी,सावरगावचे माजी उपसरपंच आनंद बोबडे, रोहित पाटील, पांडुरंग माळी, बसवणप्पा मसुते, मसला येथील सरपंच वैद्य,नाना शिंदे,पोलीस मित्र सुरज ढेकणे, पोपट मोठे,गोपनीय ठाणे अंमलदार आकाश सुरनर, शिवाजी शिरसट आदी मान्यवरांसह तामलवाडी पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचारी,सर्व पोलीस पाटील,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 सन्माना प्रसंगी सपोनि सचिन पंडित म्हणाले की, आज जो माझा सन्मान होतोय त्यात माझे सहकारी,कर्मचारी,यांचा मोलाचा वाटा आहे त्यांच्या सहकार्यामुळेचे मी चांगले व आदर्श काम करू शकलो. तसेच माणसांच्या जीवनात संघर्ष हा  जीवनाचा अविभाज्य घटक असून  संघर्षाला धिराने, आपुलकीने आणि एकमेकांवर प्रेम करत पुढे जावे हेच या सन्मान सोहळ्यानिमित्त सांगता येईल.
   
 
Top