नळदुर्ग ,दि. ०१

राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे न्यायिक सदस्य श्री.उमाकांत मिटकर यांच्या वाढदिवसानिमित्त वागदरी ता.तुळजापूर  ग्रामपंचायतीच्या वतीने एक कोटींच्या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा व पूर्ण झालेल्या योजनांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

याप्रसंगी गावचे ग्रामदैवत सद्गुरू भवानसींग महाराज यांना अभिषेक करून जलजीवन मिशन अंतर्गत 46,50,268 रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन झाले.यामुळे वागदरी ग्रामस्थांना घरोघरी नळाद्वारे चोवीस तास स्वच्छ व मुबलक पाणी मिळणार आहे.याशिवाय ग्रामपंचायत कार्यालय कंपाऊंड,बंदिस्त गटार,पेव्हर ब्लॉक बसवणे,स्मशानभूमी सिमेंट रस्ता,सौर ऊर्जा लॅम्प बसवने,इत्यादी मंजूर झालेल्या कामांचा शुभारंभ करण्यात आला.

एसबीआय फाउंडेशन व दिलासा संस्थेच्या माध्यमातून पाच लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या सिमेंट बंधाऱ्याचे व जि.प.प्रा.शाळेला केलेल्या सुशोभीकरणाचे लोकार्पण करण्यात आले.यावेळी माजी सरपंच श्री.ज्ञानेश्वर पाटील यांनी ग्रामपंचायत कार्यालयास निलकमल खुर्च्या व शिक्षक नेते श्री.प्रशांत मिटकर यांच्या वतीने शाळेस प्रतिमा भेट दिल्या.

मदनराजे पाटील मित्र मंडळाच्या माध्यमातून गावातील महिला भगिनींना प्रा.संतोष पवार प्रस्तुत होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.नेहमीच्या कामात गुंतलेल्या महिलांनी यावेळी मनसोक्त नाचगाणे व जल्लोष केला.प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवलेल्या महिलेस अनुक्रमे पैठणी व चांदीची मूर्ती भेट देण्यात आली. याप्रसंगी वागदरी ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

 
Top