नळदुर्ग, दि.१९
नळदुर्ग शहराच्या विविध विकास कामासाठी
शासनाच्या नगरविकास विभागाकडुन आलेला निधी व जिल्हा नियोजन समितीचा निधी खर्चुन विकास कामे वाटपातील झालेल्या गैरप्रकार उघडकीस आणुन त्यावर सडकुन टिका करत जनतेस अंदाज पञकाच्या तरतुदीनुसार दर्जेदार कामे करुन घेण्याचे आवाहन राष्ट्रीवादी काॕग्रेस पक्षाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य अशोक जगदाळे यांनी पत्रकार परिषदेद्वारे केले आहे.
नळदुर्ग शहराच्या विकासासाठी आलेला करोडो रुपयेचा निधी खर्च करताना विकास कामे वाटून घेण्यासाठी सुरू असलेला वाद, पोटगुत्तेदारी, कार्यारंभ आदेश देऊन दोन महिन्यानंतरही ऐंशी टक्के कामास सुरवात न होणे, शहरात वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या घटना याबद्दल चिंता व्यक्त करत राष्ट्रीवादीचे अशोक जगदाळे यांनी आंदोलनही करणार असल्याची माहिती दिली.
शहरात विविध योजनेतून शासनाकडून आलेला निधी हडप करण्यासाठी चुकीच्या पद्धतीने निविदा प्रक्रिया राबवणे, कमी रकमेच्या निविदा नाकारून शासनाचा पैसा अनावश्यक खर्च करणे, एकेका कामासाठी दोन ते तीन पोट गुत्तेदार आढळून येणे. एका पक्षाच्या चार पदाधिकार्यांनी मिळून कामे वाटून घेणे, प्रशासनातील व्यक्तीने एखाद्या पक्षासाठी निधी वसूल करणे असे प्रकार घडत असल्याचा आरोप जगदाळे यांनी केला. तसेच शासनाच्या नगरविकास विभागाकडून आलेला निधी व जिल्हा नियोजन समितीचा निधी आला आहे. असा निधी सर्वच पालिकेंना देण्यात आला असताना आमच्या नेत्याने आणला म्हणून श्रेय घेण्यासाठी होर्डींग लावणे हास्यास्पद असल्याची टीका जगदाळे यांनी केली. चांगला निधी आला आहे कामेही चांगल्या दर्जाची करा, जिथे लोकवस्ती नाही तिथे कामे करू नका, खासगी लेआऊट असलेल्या ठिकाणी निधी खर्च करत असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला.
शहरातील कायदा व्यवस्था ढेपाळली आहे, अवैध धंदे, मटका, जुगार, हातभट्टी दारू विक्री, गुटखा विक्री जोरात सुरू आहे. सामाजिक वातावरण क्लुषीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तरूणाई गुन्हेगारीकडे वळत आहे. शहरासाठी ही बाब धोकादायक असून पोलीस महासंचालकांची याबाबत भेट घेणार असल्याचे जगदाळे यांनी सांगितले.