काटी ग्रामपंचायत कार्यालयात उद्योजक अजयकुमार करंडे यांचा सत्कार 
तरुणांनी नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा स्वतंत्र व्यवसाय   करावा  - करंडे
 
काटी, दि.१३: उमाजी गायकवाड 


तुळजापूर तालुक्यातील काटी येथे  बाजार समितीचे माजी संचालक तथा सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर यांच्या पुढाकाराने येथील ग्रामपंचायत कार्यालयात रविवार दि.13 रोजी सकाळी पुणे येथील उद्योजक तथा सासुरे ता. बार्शी येथील मुळ रहिवासी सर्वसामान्य कुटुंबातील बी. ई .मेकॅनिकल इंजिनिअरींग पदवी प्राप्त उद्योजक अजयकुमार करंडे यांचा विविध  मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ, व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.


प्रारंभी प्रास्ताविकात जयाजी देशमुख यांनी पाहूण्याची ओळख करुन  दिली तर सरपंच  परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर यांनी मराठी तरुण उद्योग क्षेत्रात अग्रेसर असल्याचा अभिमान असल्याचे सांगून त्यांच्या उद्योग व्यवसायासाठी शुभेच्छा  दिल्या.


यावेळी उद्योजक अजयकुमार करंडे हे सत्काराला उत्तर देताना म्हणाले की, आज शेती, तसेच नोकरी या दोन्ही गोष्टी बेभरवशाच्या होत आहेत. तसेच आज उत्तम शेती, दुय्यम धंदा व कनिष्ठ नोकरी हा क्रम आता उत्तम नोकरी, दुय्यम धंदा व कनिष्ठ शेती झाल्याने पदवी किंवा पदविकाधारक तरुण-तरुणींनी स्वतंत्र व्यवसायांकडे वळण्याचे आवाहन  केले. जगदंबा इंजिनिअरिंग कंपनीच्या माध्यमातून पुण्यात व बाहेर राज्यातील अनेक तरुणांना रोजगाराच्या  संधी दिल्याचे सांगून यापुढेही आपण गावातील तरुण एकत्र करून उत्कर्ष फाऊड़ेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी कार्यक्रम हाती घेतले असून या माध्यमातून गावाकडील व परिसरातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणार असल्याचे व काटी  गावाच्या विकासात्मक कामासाठी मदतीचे आश्वासन दिले. पुढे बोलताना ते म्हणाले की, वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य लोकांना; तसेच शिक्षित तरुणांना शहरात स्थायिक होणे, स्वतःचे घर घेणे जिकिरीचे होत आहे. वडिलोपार्जित शेतीवाडीत म्हणावा तितका जमिनीचा हिस्सा मिळत नसल्यामुळे, गावाकडे नवीन प्रकल्प साकारणे व स्थायिक होणे, ही तारेवरची कसरत ठरत आहे. मग दुय्यम धंदा हा पर्याय शिल्लक राहतो आणि म्हणूनच आज पदवीधारकांनी रोजगार निर्मिती; तसेच व्यवसायाकडे वळले  पाहिजे असे त्यांनी आवर्जून सांगितले. 


यावेळी सरपंच  परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर, प्रशांत भारती ( उद्योजक सासुरे),सादिक शेख, ज्ञानेश्वर नागणे, कैलास साळुंखे, तुकाराम आडसूळ,डॉ.अजित राठोड,  चंद्रकांत काटे,अभिमान बामणकर,अमोल गावडे, भैरीनाथ काळे,जयाजी देशमुख, प्रविण विभूते, तानाजी हजारे आदी मान्यवर उपस्थित होते.
 
Top