एन.व्ही.पी शुगर कारखाना शेतकऱ्यांना केंद्र बिंदू मानून काम करणार - खा राजेनिंबाळकर , 
प्रती टन २७०० रुपये भाव देणार असल्याची घोषणा 

धाराशिव दि.२४ 


 बाकीच्या गुळ पेट्यासारखा एन.व्ही.पी. शुगर प्रा. लि., या कारखान्याचा भाव राहणार नाही. कारण हा कारखाना शेतकऱ्यांना केंद्र बिंदू मानून काम करणारा आहे.  त्यामुळे या कारखान्याचे कामकाज बघून बाकीच्या गुळ पेट्या चांगले काम करतील, असा विश्वास खा ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दि.२४ सप्टेंबर रोजी व्यक्त केला. दरम्यान, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला प्रती टन २ हजार ७०० रुपये भाव देणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

धाराशिव तालुक्यातील जागजी येथील एन.व्ही.पी. शुगर प्रा. लि., या कारखान्याच्या चाचणी गळीत हंगामाचा शुभारंभ उसाची मोळी टाकून खा राजेनिंबाळकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जागजी येथील ज्येष्ठ नागरिक रंगनाथराव सावंत गुरुजी, हभप नवनाथ महाराज चिखलीकर, ऊस उत्पादक शेतकरी हनुमंतराव देशमुख, हभप काकासाहेब डांगे, तानाजी मगर, भारत लोमटे, सुभाष पाटील, अभिजीत मगर, सुधाकर साळुंखे, आत्माराम सरडे, अनुरथ भोसले, तुळशीदास जमाले, काकासाहेब मिसाळ, जहॉंगीर सय्यद, बाबासाहेब शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. 



या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष केशव उर्फ बाबा पाटील, कुलदीप पाटील (विटेकर),  स्वराज ट्रॅक्टरचे डीलर हिम्मतराव पाटील, सचिन शिंदे व साई श्रुती इंडस्ट्रीजचे सोमनाथ जानते, आप्पासाहेब पाटील, धनंजय पाटील व नानासाहेब पाटील आदी उपस्थित होते. पुढे बोलताना खा राजेनिंबाळकर म्हणाले की, या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची या भागात साखर कारखाना उभा करण्यात यावे अशी मागणी होती. त्यामुळे हा कारखाना असला तरी शेतकऱ्यांचे हित जोपासले जाईल असे त्यांनी सांगितले.



 पूर्वी उसाचे क्षेत्र वाढले असल्यामुळे ऊस कारखान्याकडे जातो का नाही ? त्यामुळे उसाला किती भाव देईल ? याची खात्री नव्हती. मात्र सध्या कारखानदारी क्षेत्रात असलेली अनिश्चितता दूर होण्यास नक्कीच मदत होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच या कारखान्याचा होणारा नफा हा प्रथम ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी ठेकेदार, वाहन पुरवठादार, बॅंक व शेवटी मालक अशी भूमिका घेणारा प्रायव्हेट क्षेत्रातील हा एकमेव कारखाना आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर नानासाहेब पाटील म्हणाले की, दि.२२ सप्टेंबर २०२२ या कारखान्याचे  व्यंकटराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन केले.  तर उसाची मोळी टाकण्याचा कार्यक्रम एक वर्षाने केला. मात्र या कार्यक्रमास वडील व आई दोघेही हयात नाहीत. तसेच खा राजेनिंबाळकर यांचे कर्तुत्व पाहायला त्यांचे देखील वडील हयात नाहीत. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात ध्येय असते की आपण केलेले काम बघायला आपले आई-वडील असावेत अशी अपेक्षा असते असे त्यांनी सांगितले. उसाची  मोळी आज टाकली असली तरी चार ते पाच ऑक्टोबरला कारखाना सुरू होईल. कारखाना गुणवत्तेवर चालविला जाणार असून शेतकऱ्यांनी देखील ऊस गळपासाठी देताना गुणवत्ता, परिपक्वता व साखरेचे प्रमाण बघून द्यावा असे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन दौलत निपाणीकर तर उपस्थितांचे आभार नानासाहेब पाटील यांनी मानले. यावेळी शेतकरी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top