मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत वागदरीत सर्व पक्षीय नेत्यांना गाव बंदी : सकल मराठा समाजाच्या वतीने बँनरबाजी
वागदरी,दि.२८ : एस.के.गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील मौजे वागदरी येथील छत्रपती चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने डिजिटल बँनरबाजी करून सर्व पक्षीय नेत्यांना मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत गावबंदीचा इशारा देण्यात आला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या स्व:ताच्या अंतरावली सराटी गावात मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात सामाविष्ट करून ओबीसीचे आरक्षण द्यावे या मागणी करिता पहिल्या टप्प्यात केलेल्या अमरण उपोषण आंदोलनाचे पडसाद सबंध महाराष्ट्रभर उमटले.
हे आंदोलन दिवसेंदिवस भावनिक आणि आक्रमक होत असल्याचे लक्षात येताच सरकारने मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करत ४० दिवसात मराठा समाजाला कायम टिकणारे आरक्षण देण्यात येईल असे आश्वासन देवून त्यांना उपोषण आंदोलन सोडायला लावले. सरकारने दिलेली ४० दिवसाची मुदत संपताच मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या दुसऱ्या टप्प्यातील उपोषण आंदोलनास दि.२५ आँक्टोबर २०२३ पासून पुन्हा सुरूवात केली आहे.
याही आंदोलनाचे पडसाद सबंध महाराष्ट्रभर उमटत असताना दिसून येत आहे. महाराष्ट्रभर गावोगावी सकल मराठा समाजाच्या वतीने साकळी उपोषण करून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा देताना दिसत आहे. त्याचाच भाग म्हणून वागदरी ता.तुळजापूर येथे गावच्या प्रवेशद्वारात छत्रपती चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने सर्व पक्षीय राजकीय नेत्यांना मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत वागदरी गावात प्रवेश बंदी अशी डिजिटल बँनरबाजी करून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यात आला आहे.