नळदुर्ग,दि.३०
नळदुर्ग येथिल बोरी (कुरनूर मध्यम प्रकल्प) धरणातून अवैध पाणी उपसा बंद करुन विदयुत पंप जप्तीची कारवाई आठवड्यात करावी, अन्यथा दि.६ नोव्हेंबर रोजी पाटबंधारे कार्यालयासमोर माजी नगरसेविका छमाबाई धनराज राठोडसह नागरीकाच्या वतीने उपोषाण करण्याचे निवेदन जिल्हाधिका-यासह संबधिताना देण्यात आले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, नळदुर्ग शहरासह अणदुर, तीर्थक्षेत्र तुळजापूर व इतर गावाना पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या नळदुर्ग येथील बोरी धरणात दिवसेंदिवस पाणी पातळी कमी होत चालली आहे. उपयुक्त पाणी साठा अत्यंत कमी होत आहे. यावर्षी बोरीधरणाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान अत्यंत कमी झाले आहे. भविष्यात भिषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
बोरी धरणाच्या काठावर असलेल्या मानेवाडी गावाच्या शिवारातील शेतकरी बेकायदेशीररित्या शेतीसाठी बेसुमार पाणी उपसा करत आहेत. याप्रकरणी संभव्य पाणी टंचाईच्या अनुषंगाने जिल्हातील सर्व पाटबंधारे प्रकल्पातील उपलब्ध असलेले पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आल्याचे प्रशासनाने दि. 7/9/2023 रोजी पत्रान्वये कळवुन पाणी उपसा तात्काळ बंद करण्याचे संबधिताना आदेश दिले आहे. त्यावरुन प्रशासनाने थातुरमातुर कारवाई केली. मात्र धन दांडग्या शेतकऱ्यांनी संबधित कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन अवैध पाणी उपसा करीत असल्याचे दिसुन येत आहे. असेच पाणी उपसा सुरु राहिले तर भविष्यात जलसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याकरीता प्रशासनातील संबधीत विभागाच्या अधिकाऱ्यांसह नियुक्त केलेल्या भरारी पथकाने येत्या सात दिवसात अवैध पाणी उपसा करणाऱ्या विरुध्द कडक कारवाई करुन विदयुत पंप जप्तीची कारवाई करावी अन्यथा दि. 6/11/2023 रोजी धाराशिव पाटबंधारे उपविभाग क्र. 7 नळदुर्ग कार्यालयासमोर एक दिवसांचे लाक्षणिक उपोषण करण्यात येईल. याची नोंद घेऊन याप्रकरणी गांभिर्याने चौकशी करुन दोषी विरुध्द कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याची एक प्रत माहितीस्तव पोलीस अधिक्षक धाराशिव,
तहसीलदार तुळजापूर, सहाय्यक अभियंता पाटबंधारे उपविभागीय क्र. 7 कार्यालय नळदुर्ग, साहाय्यक पोलीस निरीक्षक नळदुर्ग आदीना देण्यात आले आहे.
निवेदनावर माजी नगरसेविका छमाबाई राठोड, बीआएसचे सुनील गव्हाणे, मनसे जिल्हा सचिव ज्योतीबा येडगे, गणेश मोरडे, बीआरएस शहराध्यक्ष अझर शेख, आम आदमी पार्टी शहराध्यक्ष वसीमखान पठाण, अक्षय भोई, शिवाजी सुरवसे प्रशांत पुदाले, रंजना ठोबे, अहमदअली मणियार, चंद्रकांत राठोड, गौस शेख, हनुमंत दूरलेकर, शंकर दुरलेकर, इत्यादीची सह्या आहेत.