लोहारा नगर पंचायतच्या प्रभारी मुख्याधिकारी यांच्या कार्यकाळातील कामकाजाची एस.आय.टी. मार्फत चौकशी करा :- माजी नगरसेवक व नागरिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
लोहारा , दि.१४ :
लोहारा (बु) नगरपंचायतचे प्रभारी मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांच्याकडे उमरगा नगर परिषद, लोहारा नगर पंचायत व धाराशिव नगरपंचायत प्रशासनाचा अतिरिक्त पदभार असल्यामुळे ते लोहारा येथे न फिरकताकर्मचाऱ्यांना बोलावून घेऊन धाराशिव येथूनच कारभार हाकत असल्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर कामे खोळंबली आहेत. त्यामुळे मुख्याधिकारी श्री. जाधवर यांना तात्काळ पदभार काढून त्यांच्या संपुर्ण कार्यकाळाची एस.आय.टी मार्फत चौकशी करावी अशी मागणी शिवसेना (ठाकरे) गटाचे माजी नगरसेवक शामसुंदर नारायणकर व नागरिकांनी (दि.१३) जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, लोहारा (बु) नगर पंचायतचे प्रभारी मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांच्याकडे उमरगा नगर परिषद व लोहारा (बु) नगर पंचायत व धाराशिव नगर पंचायत प्रशासन अधिकारी या पदाचा ही पदभार सोपविण्यात आला आहे. लोहारा शहरात कोट्यावधी रुपयांच्या कामांना श्री. जाधवर यांनी प्रत्यक्ष भेट दिलेली दिसत नाही. उमरगा व लोहारा नगर पालिकेचे कामकाज ते धाराशिव येथूनच पाहत आहेत. कामाचे चेकवर सह्या घेण्यासाठी व बिले व इतर महत्वाच्या कामासाठी न.पं. कर्मचारी हे धाराशिव ला खेटे मारत आहेत. यामुळे न.पं. मधील स्थानिक नागरिकांची कामे खोळंबली आहेत. त्यातच लोहारा न.पं. चे मुख्याधिकारी हे पद त्यांच्याकडे प्रभारी असतानाच श्री. जाधवर यांनी कार्यालयीन अधीक्षक जगदीश सोंडगे यांना पुन्हा प्रभारी मुख्याधिकारी म्हणून कामकाज पाहण्याचा अधिकार प्रदान केला आहे.
लोहारा शहरात कोट्यावधी रुपयांची कामे सुरू असून या कामामध्ये कंत्राटदार, अधिकारी, व इतर काही पदाधिकारी मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत. श्री. जाधवर यांना त्यांच्या खास मर्जीतील अधिकारी म्हणून लोकप्रतिनिधीच्या आग्रहाखातर उमरगा, लोहारा मुख्याधिकारी व धाराशिव चे नगर पंचायत प्रशासन अधिकारी म्हणून तिन्ही पदाचा पदभार सोपविण्यात आलेला आहे. कोट्यावधी रुपयांच्या कामात लोकप्रतिनिधी, अधिकारी व काही नगरसेवक यांचा प्रत्यक्ष व अपत्यक्ष सहभाग दिसून येत असल्याने लोहारा शहरातील सुज्ञ नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कामाची गुणवत्ता ढासळली असून तांत्रिक सल्लागारांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणावर भ्रष्ट्राचार वाढला आहे.
त्यामुळे प्रभारी मुख्याधिकारी श्री. जाधवर यांना तिन्ही पदारून तातडीने कार्यमुक्त करून त्यांच्या संपूर्ण कार्यकाळातील एस.आय.टी मार्फ़त चौकशी करून कारवाई करावी अशी मागाणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर माजी नगरसेवक शामसुंदर नारायणकर, बालाजी माशाळकर, नवाज सय्यद, शकील पटेल, खालिद खुटेपड, प्रेम लांडगे,किरण पाटील, अमोल बिराजदार, हरी लोखंडे, खाशीम मुल्ला, सलीम शेख, प्रकाश भगत, विजय महानूर, व्ही. एस. नरुणे, संतोष फरीदाबादकर, पंचय्या स्वामी, तुकाराम विरोधे, महेश बिराजदार, देवा महाजन, दिपक मुळे, दयानंद शेवाळे यांच्यासह आदी नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.