कार्यालयात हजर न राहणाऱ्या ग्रामसेवक व तलाठी यांच्यावर कठोर कारवाई करा - ॲड रेवण भोसले


धाराशिव दि: १२

धाराशिव जिल्ह्यात बहुतांश ग्रामपंचायत कार्यालय तसेच तलाठी सज्जा येथे ग्रामसेवक व तलाठी सातत्याने गैरहजर राहत असल्यामुळे जनतेचे काम खोळंबत  आहेत ,त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी समाजवादी पार्टीचे प्रदेश महासचिव तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
     

ग्रामसेवक व तलाठी हे ज्या गावात कार्यरत असतात तेथे न राहता ते जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी वास्तव्य करतात .त्यामुळे ज्यांना या संबंधित कार्यालयात काम असेल त्यांना तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी बोलावले जाते. ग्रामपंचायत व तलाठी यांचे सिक्के स्वतःच्या बॅगमध्ये घेऊन फिरतात व त्यांच्या सोयीनुसार  ज्यांचे काम आहे त्यांना त्यांच्याकडेच बोलावले जाते. ग्रामसेवक व तलाठी संबंधित कार्यालयात उपस्थित न राहिल्यामुळे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची सातत्याने ससेहोलपट होत आहे .ग्रामसेवक व तलाठी यांच्यावर वरिष्ठांचे कसलेही नियंत्रण न राहिल्यामुळे ते बेताल व मनमानी पद्धतीने वागून नागरिकांना त्रास दिला जात आहे .त्यामुळे सर्व नागरिकांच्या हितासाठी कार्यालयात हजर न राहणाऱ्या ग्रामसेवक व तलाठी यांच्यावर  कठोर कारवाई करण्याची मागणी ॲड भोसले यांनी केली आहे.
 
Top