श्री क्षेत्र रामतीर्थ येथे दि. १५ ते १७ डिसेंबर दरम्यान कल्याण महोत्सव कार्यक्रम
श्री.प्रभु रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र रामतीर्थ येथे दि. १५ ते १७ डिसेंबर या कालावधीत श्री. श्री. श्री. हणुमतसमेत सितासहित श्री रामचंद्र स्वामीजी उत्सवविग्रह कल्याणमहोत्सव हा कार्यक्रम संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचा लाभ रामभक्त, भाविकानी घ्यावा असे आवाहन श्री क्षेत्र रामतीर्थचे महंत श्री विष्णु शर्मा महाराज यांनी केले आहे.
नळदुर्ग शहरांच्या पुर्व दिशेला २ कि.मी अंतरावर, डोंगर दऱ्यात निसर्ग सौंदर्याने नटलेल्या ठिकाणी श्री क्षेत्र रामतीर्थ आहे. श्री क्षेत्र रामतीर्थ हे श्री प्रभु रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे श्री क्षेत्र आहे. येथे श्री प्रभु रामचंद्र दोनवेळा येऊन गेल्याचा उल्लेख आढळतो. त्यामुळे या क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. श्री क्षेत्र रामतीर्थ हे प्राचिन काळापासुन याठिकाणी अस्तित्वात आहे.
सध्या श्री क्षेत्र रामतीर्थचा कारभार महंत श्री विष्णु शर्मा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. याठिकाणी दररोज भाविकांसाठी अन्नछत्र सुरू करण्यात आले आहे. त्याचबरोबर दर शनिवारी सकाळी ९ वा. याठिकाणी हनुमान चालीसाचे पठण केले जाते. यावेळी किमान २०० ते ४०० रामभक्त उपस्थित राहुन धार्मिक कार्यक्रमाचे लाभ घेतात . हनुमान चालीसाचे पठण झाल्यानंतर याठिकाणी भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जाते.श्री क्षेत्र रामतीर्थच्या इतिहासात पहिल्यांदाच श्री क्षेत्र रामतीर्थ येथे यावर्षी महंत श्री विष्णु शर्मा महाराज यांच्या संकल्पनेतुन १५ ते १७ डिसेंबर २०२३ या कालावधीत श्री. श्री. श्री. हणुमतसमेत श्री रामचंद्र स्वामीजी उत्सवविग्रह कल्याणमहोत्सव हा भव्य दिव्य कार्यक्रम होत आहे.
या कार्यक्रमामध्ये १५ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० या काळात गोपुजा, गणपती पुजा, पुण्यहवाचन, पंचगौव्य प्राशन,दिक्षाधारण, अखंड दिपस्थापन व मंडप अराधन हे कार्यक्रम होणार आहेत.दुपारी ३.३० ते सायं.७.३० वा. विग्रहशुद्धी अभिषेक, पंचामृत अभिषेक, जलाधिवासम, प्रदोषकालअर्चन,धान्यधिवासम, शैय्याधिवासम व पुष्पाधिवासम हे कार्यक्रम होणार आहेत. दि.१६ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० वा. या कालावधीत प्रातःकाल अर्चना, मंटपदेवताहोम, उत्सवग्रह मुळमंत्र हवन, महापुर्णाहुती,कलशउद्धवासन व अवव्रथास्नानम हे कार्यक्रम होणार आहेत. दुपारी ४ वा.श्रीक्षेत्र रामतीर्थ येथेच प्रभु श्रीरामांची उत्सवमुर्तींची पालखीतुन मिरवणुक काढण्यात येणार आहे. सायं.६ ते रात्री ८ वा. या कालावधीत अंकुरअर्पण, नंदीदेवता अवाहन, गौरीपुजन व तिर्थप्रासाद हे कार्यक्रम होणार आहेत.१७ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते ९.३० यावेळेत अभिषेक व अलंकार पुजा.सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० या कालावधीत श्री सिताराम कल्याण महोत्सव हा महत्वाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर दुपारी १ ते ३ यावेळेत महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.अशाप्रकारचा कार्यक्रम नळदुर्गच्या इतिहासात पहिल्यांदाच होत आहे.
या कार्यक्रमासाठी श्री विष्णु शर्मा महाराज यांनी देशांतील सर्वश्रेष्ठ महाराजांना याठिकाणी आमंत्रित केले आहे. मंत्रोच्चारच्या जयघोषात हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. नळदुर्ग शहर व परीसरच नव्हे तर संपुर्ण धाराशिव जिल्ह्यातील रामभक्त तसेच हिंदुबांधवांनी या कार्यक्रमाचा लाभ घेणे गरजेचे आहे. हा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी श्रीक्षेत्र रामतीर्थचे महंत श्री विष्णु शर्मा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली रामभक्त पुढाकार घेत आहेत.