नळदुर्ग , दि.२२
धाराशिव जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या वतीने नळदुर्ग येथील आपलं घर बाल गृहाच्या मैदानावर चाचा नेहरू बाल महोत्सव २०२४ कार्यक्रम घेण्यात आला. दरवर्षी हा कार्यक्रम नोव्हेंबर महिन्यात घेण्यात येतो, मात्र धाराशिव जिल्हा महिला व बाल विकास विभागाकडून महोत्सव एवढ्या उशिरा घेण्याचे कारणा समजू शकले नाही. तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी महोत्सव घेण्याऐवजी नळदुर्ग येथे घेऊन प्रसार माध्यमालाही अनभिज्ञ ठेवण्यात आले.
धक्कादायक बाब म्हणजे मुलांना ट्रॕक सुट, शुजही देण्यात आले नाहीत. याबाबत विचारणा केली असता महिला व बाल विकास अधिकारी सुनील आंकुश यांनी यासाठी तरतुद नसल्याचे मोघम उत्तर दिले.
मुलांच्या कबड्डी स्पर्धेत पुष्कराज बालगृह कंडारी तर मुलीमध्ये आपलं घर बालगृह नळदुर्ग हे विजेते ठरले. समूह नृत्य स्पर्धेत आपलं घर प्रथम तर पुष्कराज बालगृह कंडारी यांच्या संघाचा द्वितीय क्रमांक आला. बाल महोत्सवामध्ये १०० मिटर. धावणे, रिले, लिंबू चमचा, पोत्यांची शर्यत, कॅरम, बुध्दिबळ, हस्ताक्षर, निबंधलेखन, चित्रकला, रंगभरण, वैयक्तिक गीत, वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाल्या. विजेत्यांना प्रमाणपत्र, चषक देण्यात आले.या स्पर्धेत जिल्ह्यातील सहा बालगृहाचे १६५ मुलं, मुली सहभागी झाले होते यामध्ये आपलं घर येथील ७३, पुष्कराज बालगृह कंडारी (परंडा) २४, संत ज्ञानेश्वर माऊली बालगृह ४, निरिक्षण गृह धाराशिव १४, जीवन विकास बालगृह तडवळे २५, सोबा नाईक बालगृह बावी- १८ व दादासाहेब मोरे बालगृह वडगाव येथील ७ बालकांनी निरिक्षकासह सहभाग नोंदवला.
बुधवार (दि.१७) रोजी उदघाटनास तहसीलदार आरविंद बोळंगे, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील अंकूश, बालकल्याण समितीचे अध्यक्ष विजयकुमार माने, सदस्य दयानंद काळुंखे यांची उपस्थिती होती.
शुक्रवार दि.१९ रोजी पारितोषिक वितरणाने महोत्सवाचा समारोप करण्यात आला.जिल्हा परिविक्ष अधिकारी व्यंकट देवकर, बाल संरक्षण अधिकारी अमोल कोव्हे, आरविंद थोरात, आपलं घरचे विलास वकील, संदिप चवले यासह कर्मचाऱ्यांनी माहोत्सव यशस्वीपणे राबवण्यासाठी कष्ट घेतले.