जिल्हा परिषद स्पेशल प्राथमिक शाळेत डिजीटल क्लासरुमचे अनावरण
मुरूम, ता. उमरगा, दि. ३१
येथील जिल्हा परिषद स्पेशल प्राथमिक शाळेत सोमवारी (ता. २९) रोजी डिजीटल क्लासरुमचे अनावरण हिमाचल प्रदेश येथील शासकीय अभियंता तथा मुरूमचे सुपूत्र शिवाजी शिंदे व त्यांच्या पत्नी रुपाली शिंदे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका प्रमिला तुपेरे होत्या. यावेळी रुपाली शिंदे, धम्मचारी धम्मभुषण राम कांबळे, धनराज शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आनंद कांबळे, उपाध्यक्ष ज्ञानसागर भालेराव, सदस्य बळीराम भालेराव, कल्पना कांबळे, महानंदा कांबळे, संपता सागर, रेश्मा मुरूमकर, सखी सावित्री सदस्या सुनिता कांबळे, डॉ आंबेडकर शहर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष रुपचंद गायकवाड, सिध्देश्वर भालेराव, ऐश्वर्या शिंदे आदी उपस्थित होती.
सध्याच्या तंत्रज्ञानाच्या काळात डिजीटल अध्ययनात मुलांना रुची निर्माण व्हावी. यासाठी शिवाजी शिंदे यांनी शाळा डिजिटल करण्यासाठी अध्ययन प्रभावी होण्यासाठी चार स्मार्ट टी. व्ही. संच भेट दिली. शिवाजी शिंदे हे स्पेशल शाळेचे माजी विद्यार्थी असून सध्या ते हिमाचल प्रदेश मध्ये शासकीय अभियंता म्हणून कार्यरत आहेत. याप्रसंगी शाळेतील सेवानिवृत्त शिक्षक बी. जी. कांबळे व कांत खुने यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवाजी शिंदे व राम कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पुढील वर्षापासून गरीब व होतकरू अशा दोन मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याचा मानस रुपाली शिंदे यांनी व्यक्त केला. बुद्धीबळ स्पर्धेत तालुका स्तरावरील प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या श्रीज्ञा सतीश भालेराव हिचा सत्कार करुन पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. रेणुका कुलकर्णी यांनी लोकसहभागातून शाळेतील प्रगतीचा लेखाजोखा मांडला. सुनिता मिरगाळे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी राबवत असलेले विविध उपक्रमांची माहिती सांगितली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमर कांबळे, रोहित कांबळे, सचिन शिंदे, राजू कटके आदींनी पुढाकार घेतला. प्रास्ताविक शिवाजी गायकवाड यांनी केले. सुत्रसंचलन रुपचंद ख्याडे तर आभार मंगल कचले यांनी मानले.
मुरूम, ता. उमरगा येथील जिल्हा परिषद शाळेत डिजिटल क्लासरुमचे अनावरण करताना शिवाजी शिंदे, रूपाली शिंदे, राम कांबळे, प्रमिला तुपेरे व अन्य.