वागदरी(एस.के.गायकवाड):
आजचे राजकारण हे सत्ता व स्वार्थ यात अडकून पडले आहे.देशाची व जनतेची सेवा करण्याचे सोडून एकहाती सत्ता कायम कशी राहील यासाठी सर्व नितीमुल्ये पायदळी तुडवत राजकारण केले जात आहे. ही परस्थिती परवडणारी नाही
देशात हुकुमशाही डोकावत असल्याचे दिसत असून विचारवंतानी याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज असून जनतेनी सावध राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ वयोवृध्द नेते कोंडप्पा कोरे यांनी येथील गौरव सोहळा या हृदयस्पर्शी कार्यक्रमात आपल्या सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले.
अणदूर येथे रविवार दि.२५ रोजी हुतात्मा स्मारकातील स्व.सेनानी विरभद्रय्या स्वामी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक श्रीमंत मुळे हे होते. यावेळी भाजपाचे धाराशिव जी.प.चे प्रथम सदस्य कोंडप्पा कोरे व अक्कलकोट भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष मल्लिनाथ स्वामी यांचा सपत्नीक भव्य सत्कार करण्यात आला.याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर गुंड गुरुजी, सिद्धिविनायक उद्योग समूहाचे अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी व सरपंच रामचंद्र आलुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री निलकंठेश्वर मठाचे मठाधिपती शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते कोंडप्पा कोरे व मल्लिनाथ स्वामी या ज्येष्ठ भाजपा नेत्यांचा शाल,श्रीफळ, पुष्पहार, पुष्पगुच्छ व लोकसेवक सन्मानपत्र देऊन हलग्यांच्या कडकडाटात सपत्नीक गौरव करण्यात आला.
यावेळी सत्कारला उत्तर देताना कोरे यांनी मानवी जीवनात त्याग व समर्पण महत्त्वाचे असून सर्वसामान्य जनतेसाठी राजकारण करण्याची गरज आहे. आजचे राजकारणी व लोकप्रतिनिधी जात व धर्माच्या नावाखाली लोकांच्या अडचणी वाढवत असून सत्तेतून संपत्ती व संपत्तीतून सत्ता असे गणित मांडत आहेत सर्वच राजकीय पक्षात ही परिस्थिती असून भाजपही त्याला अपवाद नाही असा घरचा आहेर दिला. राजकीय पक्ष म्हणजे खरेदीचे दुकान झाले असून तरुणवर्ग व्यसनाधीन होत असून शेतकऱ्याची अवस्था बिकट झाल्याने तो आत्महत्या करीत आहे त्याकडे राज्यकर्त्यांचे लक्ष नाही अशी खंत व्यक्त करून मी भाजप सोडणार नाही मात्र राजकीय परस्थिती बदलण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करीत राहणार असे परखड मत व्यक्त केले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर गुंड,दत्ताभाऊ कुलकर्णी, सत्कारमूर्ती मल्लीनाथ स्वामी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी यांनी आपल्या आशिर्वचनात कोरे व स्वामी या सत्कारमुर्तींचा नि: स्वार्थंपणा, त्याग व गेली ४० वर्षे समाजासाठी दिलेले योगदान याचे कौतुक करून त्यांना शुभाआशीर्वाद दिले. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचा गौरव समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. बाबुराव मुळे व महादेव सालगे यांनी सन्मान पत्राचे वाचन केले तर प्रास्ताविक व सूत्रसंचालन राजेंद्र स्वामी यांनी केले. मुळे गुरुजी यांच्या भाषणाने अध्यक्षीय समारोप झाला. राजेश देवसिंगकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भारतमाता प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.
या कार्यक्रमास माजी जीप सदस्य महादेवप्पा आलुरे, शिवाजी घुगे गुरुजी, प्रा.अनिता मुदकण्णा, प्रभात मंडळाचे मान्यवर,उपप्राचार्य मल्लिनाथ लंगडे,दत्ता राजमाने, काशिनाथ शेटे सावकार, दीपक आलुरे,सुभद्राताई मुळे, विश्व हिंदू परिषदेचे बाबुराव पुजारी,भाजप युवा मोर्चाचे आनंद मुळे, भाजपा महीला आघाडीच्या जयश्री स्वामी, किशोर बायस,भागवत स्वामी आदी मान्यवरासह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येनी उपस्थित होते. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी राजेश देवसींगकर,सुहास कंदले,रामेश्वर जिरोळे, उमाकांत कर्पे,महावीर कंदले,दत्ता राजमाने,महादेव सालगे,बाबुराव मुळे, विश्व हिंदू परिषदेचे बाबुराव पुजारी, सुभद्राताई मुळे आदींनी परिश्रम घेतले.