बोरी धरणातून महामार्गाच्या कामासाठी बेकायदेशीर टॕकरने पाणी उपसा होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस
नळदुर्ग,दि.०६
तीर्थ क्षेत्र तुळजापूर , नळदुर्गसह इतर गावाना पाणी पुरवठा करणा-या बोरी धरणात अत्यंत कमी पाणी सठा असुन याच बोरी (कुरनूर मध्यम प्रकल्प) धरणातून राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी विना परवाना टॕकरने पाणी उपसा होत असल्याचा प्रकार बुधवार दि. ६ रोजी दुपारी उघडकीस आला. राष्ट्रीय महामार्गचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराकडून पिण्यासाठी अरक्षित केलेले पाणी बेकायदेशीररित्या खुलेआम उपसा होत असताना पाटबंधारे विभागासह प्रशासनाला याची किंचितही माहिती नसल्यामुळे शहरवासियातुन संताप व्यक्त केला जात आहे.
तुळजापूर, नळदुर्ग, अणदूर व काही लहान गावाची तहान भागवणा-या बोरी धरणात सध्या फक्त आठ टक्के पाणी साठा आहे. यामुळे संपूर्ण उन्हाळ्यात भिषण पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. मात्र राष्ट्रीय महामार्गावरील नळदुर्ग ते अणदूर दरम्यान रखडलेले काम करणाऱ्या ठेकेदाराकडून फक्त पिण्यासाठी आरक्षित असलेल्या बोरी धरणातील पाण्याची लुट करणारा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. बोरी धरणाच्या कोरड्या पडत चालेल्या सांडव्यातुन टॕकर घालून इंधनावर चालणारे पंप लावून पाणी उपसा केला जात आहे. नागरिकांनी यास विरोध केल्यानंतर संबंधित टॕकर क्र. के.ए. २० ए.५२२२ या क्रमांकाच्या टॕकर चालकाने टॕकरसह पलायन केले. या टॕकरवर एसएसी इंजिनियरींग असे नाव लिहलेले आहे.
दरम्यान या घटने प्रकरणी संबधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करुन टँकर जप्त करण्याची मागणी नागरिकातुन होत आहे.