नंदगाव ग्रामपंचायतीच्या गैरव्यहाराच्या चौकशीत
सरपंच व ग्रामसेवक दोषी असल्याचा अहवाल बिडीओने धाराशिव जिल्हा परिषदेस केले सादर
नळदुर्ग ,दि. २८ शिवाजी नाईक
नंदगाव ता तुळजापूर येथील ग्रामपंचायतीच्या गैरव्यहाराची चौकशी करुन पंचायत समितीचे गटविकास आधिकारी अमोल ताकभाते यांनी प्र. सरपंच व ग्रामसेवक दोषी असल्याचा अहवाल पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी धाराशिव जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी आधिकारी यांच्याकडे पाठविला आहे. माञ याप्रकरणी आठवडा उलटूनही प्रशासनाने दोषीविरुध्द कांहीच कार्यवाही केली नसल्याने ग्रामस्थातुन जिल्हा परिषदेच्या कारभाराबाबत संशय व्यक्त केले जात आहे.
15 वा वित्त आयोग व ग्रामनिधी मधील कामे न करता परस्पर बिल उचलले बाबत व चौकशी असमाधानकारक झाल्याने दि.16 एप्रिल रोजी सचिन कोरे, सागर चौगुले, मल्लिनाथ गुड्डे, विश्वजीत घंटे, रहीम शेख, हिरालाल वाले, सतीश काटे, श्रीशैल कामशेट्टी आदीनी आक्षेप घेऊन सदर प्रकरणात फेर चौकशी करण्याची मागणी केली. त्यानुसार तुळजापूर प.स. गटविकास अधिकारी यानी दि.21 मे रोजी धाराशिव जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना अहवाल देऊन विस्तार अधिकारी ए.पी. काळे यांना फेर चौकशी करण्याबाबत नियुक्त् केल्याचे सांगून नंदगाव ग्रामपंचयायत गैरप्रकाराची चौकशी अहवालानुसार ग्रामपंचायतने मागासवर्गीय वस्तीमध्ये सिमेंट बेंच बसविणे, डस्टबिन खरेदी करणे, शौचालय युनिट खरेदी, शाळा साहित्य खरेदी, फँगींग मशीन खरेदी करणे इत्यादी साहित्य दर पत्रक व प्रमाणका आधारे खरेदी केले आहे. वास्तविक महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता 2011 व शासन मार्गदर्शक सूचनेनुसार कोणतेही साहित्य खरेदी करण्यापूर्वी ई. निविदा अथवा जाहिरात वर्तमानपत्रात देऊन पुरवठा दराचे दर पत्रक घेऊन त्याचा तुलनात्मक तक्ता तयार करून तदनंतर कमी दर देणाऱ्या पुरवठादारास साहित्य पुरवठा आदेश देणे आवश्यक होते.
तथापी प्रभारी सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी अशी कार्यवाही केलेली नाही. फक्त तीन पुरवठा धारकाचे दरपत्रक घेतले असल्याचे दर्शवून प्रमाणका आधारे खरेदी करून अनियमितता केल्याचे दिसून येते. तसेच प्र.सरपंच यांनी पार्श्व इंटरप्राईजेस सोलापूर यांच्याकडून गावातील होणाऱ्या नुकसान दुरुस्तीसाठी रुपये 5 लाख 62 हजार 500 रूपये. अनामत घेतले. त्यांना रक्कम रुपये 4 लाख 60 हजार रूपये परत केल्याचे दिसून येते. उर्वरित रक्कम रुपये 1 लाख 02 हजार रूपये ग्रामपंचायतने ठेवले आहे. वास्तवात पार्श्व इंटरप्राईजेस सोलापूर यांचे काम पूर्ण झाल्यानंतर सदरील कंत्राटदाराकडून खोदकाम करताना झालेल्या नुकसानीसाठी रक्कम सक्षम प्राधिकरणाकडून निश्चित करून व ती नुकसानीचे काम पूर्ण करून उर्वरित रक्कम संबंधितास परत करणे आवश्यक होते. तथापि प्रभारी सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी तशी कोणतीच कार्यवाही केलेली दिसून येत नाही.
तसेच पार्श्व इंटरप्राईजेस कडून अनामत घेतलेली रक्कम ग्रामपंचायतच्या दैनंदिन कामासाठी खर्च करून अनियमितता केली असल्याचे दिसून येते. सबब उक्त दोन मुद्द्याच्या अनुषंगाने सरपंच व ग्रामसेवक दोषी असल्याबाबतचा अहवाल पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी धाराशिव जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी आधिकारी यांच्याकडे दि.२१ मे रोजी पाठविण्यात आले आहे.
दरम्यान चौकशी अहवाल समाधानकारक न झाल्याने त्यावर संबंधितांनी हरकत घेऊन फेरचौकशीची मागणी करत नंदगांव ग्रामपंचायत मधील 13 लाख 60 हजार रूपयेचा प्र.सरपंच व ग्रामसेवक यांनी गावातील विविध 15 वा वित्त आयोग व ग्रामनिधी मधील कामे न करता संबंधितांना बिले आदा केले असुन ग्रामनिधीतुन 5 लाख 62 हजार रूपये आनामत उचलले असल्याचे सांगुन या प्रकरणी पं.स. गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केलेली होती. याबाबत चौकशी झाली असता चुकीचा अहवाल देऊन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न विस्तार अधिकारी यांनी केले असल्याचे ग्रामस्थानी तक्रार करुन संबंधित दोषी विरूध्द कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. या घटनेला 2 आठवडे होत आले. या प्रकरणी अद्यापर्यंत कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थातुन आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याप्रकरणी नंदगाव पंचक्रोशित ग्रामपंचायत व प्रशासनाबद्दल चर्चा रंगली आहे.