तुळजापूर : छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करियर शिबिरास विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहण्याचे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी मा. प्रविण औताडे यांचे आवाहन
नळदुर्ग ( प्रा. डॉ. दिपक जगदाळे )
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तुळजापूर यांच्या वतीने दिनांक 19 जुन रोजी सकाळी 10 ते 4 या वेळेत *तुळजाभवानी पुजारी मंडळ फंक्शन हॉल,पोलीस स्टेशन समोर धाराशिव रोड तुळजापूर* येथे शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी लोकप्रतिनिधी, प्रमुख तज्ञ वक्ते, मार्गदर्शक, अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
दहावी बारावी नंतरचे महाविद्यालयीन अभ्यासक्रम, करियर च्या संधी, महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया, कलमापन चाचणी, शैक्षणिक शिष्यवृत्ती व कर्ज योजना, करियर प्रदर्शणी, औदयोगिक प्रशिक्षण व कौशल्य विकास उपक्रम याबाबत तज्ञ व्यक्तीकडून सखोल मार्गदर्शन मिळणार आहे.
या कार्यक्रमासाठी अनेक वित्त महामंडळे, बँका, महाविद्यालये, कौशल्य विकास केंद्र, औदयोगिक आस्थापना यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तुळजापूर यांच्या वतीने हि एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. शिबिरात उपस्थितांची नोंदणी केली जाणार आहे.
तरी विद्यार्थी व पालक यांनी दहावी बारावी नंतर कसे करियर घडवायचे याबाबतच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रविण औताडे व प्राचार्य मारुती बिरादार यांनी केले आहे. प्रा. दिपक जगदाळे नळदुर्ग