लाडकी बहीण योजनेचा जिल्ह्यातील सर्व पात्र महिलांना लाभ देण्याचे नियोजन करावे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत

 

धाराशिव दि. १८

 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही राज्य सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे.या योजनेअंतर्गत 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला पंधराशे रुपये जमा करण्यात येणार आहे.त्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यांबरोबरच त्यांची आरोग्यविषयक सुधारणा होण्यास मदत होणार आहे.कुटुंबात महिलांची भूमिका देखील मजबूत होण्यास या योजनेचे महत्त्व राहणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोणतीही पात्र महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेऊन सर्व पात्र महिलांना या योजनेचा लाभ देण्याचे नियोजन करावे असे निर्देश पालकमंत्री प्रा डॉ.सावंत तानाजीराव सावंत यांनी दिले.

आज 18 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन समिती सभागृहात मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेचा आढावा घेताना पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत बोलत होते. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आमदार सर्वश्री विक्रम काळे, राणाजगजीतसिंह पाटील कैलास पाटील घाडगे,ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष व पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रा डॉ. सावंत म्हणाले,पात्र महिलांना ग्रामीण व शहरी भागात योजनेचा लाभ मिळण्यासाठी रजिस्टरमध्ये नोंद घ्यावी.त्या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे त्यांच्याकडून मागून घ्यावी. अर्ज भरताना त्यांना मदत करावी.योजनेचा लाभ मिळण्यासाठी जी प्रक्रिया पूर्ण करावी लागते, त्यासाठी महिलांना सर्वतोपरी सहकार्य करावे.अर्ज भरताना त्यांना त्रास सहन करावा लागणार नाही याची दक्षता घ्यावी.दररोज नोंद होणाऱ्या महिलांची रजिस्टरमध्ये नोंदणी करावी.ऑफलाइन नोंदणी करून त्यांची नावे अपलोड करावी. या योजनेच्या सर्व याद्या स्कॅन करून ठेवाव्यात असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण या योजनेची व्यापक प्रसिद्धी करण्यासाठी गाव पातळीवर योजनांचे फ्लेक्स लावण्यात यावे असे सांगून प्रा.डॉ.सावंत पुढे म्हणाले,या फ्लेक्सवर अर्ज कसा करावा,त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात याची माहिती ठळकपणे

 असावी. 31 जुलैपर्यंत जिल्ह्यातील सर्व पात्र महिलांचे अर्ज भरून घ्यावे.संबंधित यंत्रणांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी तोपर्यंत सुट्टीवर जाऊ नये.एक सामाजिक बांधिलकी म्हणून हे काम करावे.पात्र महिलांना या योजनेसाठी लागणाऱ्या कोणत्याही कागदपत्रांची अडचण जाणार नाही याकडे लक्ष द्यावे.महिलांचे ऑफलाईन अर्ज स्वीकारून ग्रामसेवक व तलाठ्यांना या कामी लावावे असे ते म्हणाले.

खासदार श्री. राजेनिंबाळकर म्हणाले, या योजनेच्या लाभासाठी महिलांना अर्ज भरताना त्रास होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी.आमदार काळे म्हणाले,महिलांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी गावपातळीवर शिबिरांचे आयोजन करावे.योजनेच्या लाभासाठी कोणते कागदपत्रे लागतात त्याची माहिती महिलांना द्यावी. त्यांच्याकडून अर्ज भरताना अडचण जाणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे,असे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ.ओंबासे म्हणाले, 31 जुलैपर्यंत सर्व पात्र महिलांची नोंदणी करण्याचे नियोजन आहे.4 लाख 48 हजार महिलांना जिल्ह्यात या योजनेचा लाभ देण्याचा इष्टांक आहे.त्यापेक्षाही पात्र महिलांची संख्या जास्त असू शकते.यामुळे या योजनेचा पात्र महिलांना लाभ देण्यासाठी निधी मागणी करण्यात येईल.अंगणवाडी सेविका व ग्रामसेवक यांच्या माध्यमातून गावपातळीवर लाभार्थी महिलांची नोंदणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकातून निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती शोभा जाधव यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा उद्देश,योजनेची वैशिष्ट्ये,योजनेचे पात्र व अपात्रतेचे निकष,अंमलबजावणीसाठी गठित करण्यात आलेल्या समित्या,करण्यात येत असलेली कार्यवाही याबाबतची माहिती देऊन 17 जुलैपर्यंत 1 लाख 30 हजार 773 महिलांचे अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 89 हजार 319 महिलांचे अर्ज पात्र झाल्याची माहिती त्यांनी दिली.

या सभेला उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) श्री.गिरी जिल्हा महिला बालविकास अधिकारी श्री.अंकुश यांचेसह सर्व उपविभागीय अधिकारी,सर्व तहसीलदार,गटविकास अधिकारी व बाल विकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.


 
Top