नळदुर्ग येथे पत्रकार संवाद यात्रेचे मान्यवरांच्या हस्ते पोस्टर प्रकाशन 

नळदुर्ग,दि.२६

लोकशाहीच्या बळकटीसाठी, पत्रकारांच्या हक्कासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या वतीने या पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार संवाद यात्रा नागपूर (दीक्षाभूमी) ते मुंबई मंत्रालय पर्यंत दि. २८ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान होणार असून या संदर्भातील 'पोस्टर' चे प्रकाशन नळदुर्ग ता.तुळजापूर येथे बसस्थानकाच्या समोर  डॉ.बाबासाहेब आंबेडकर संविधान चौकात करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई तालुका शाखा तुळजापूरच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते तथा माजी जि.प.सदस्य गणेश सोनटक्के , पत्रकार राजेंद्र स्वामी यांच्या हस्ते तर सामाजिक कार्यकर्ते तथा डॉ आंबेडकर इंटर नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नळदुर्गचे संस्थापक मारुती खारवे, संपादक शिवाजी नाईक, पञकार दादासाहेब बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न  झाला.

 प्रसिद्धी माध्यम अर्थात पत्रकारीता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे असं म्हटलं जातं. शासनाने जनहिताच्या कोट्यवधी रुपयांच्या जाहीर केलेल्या योजना व धोरणात्मक निर्णय जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम आपापल्या प्रसिद्धी माध्यमांतून पत्रकार प्रामाणिकपणे करतात. मात्र लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावणाऱ्या पत्रकारांच्या प्रश्नांकडे केंद्र आणि राज्य सरकार दुर्लक्षच करीत असल्याचे दिसून येते. पत्रकार हा देखील एक मतदार आहे. याचा विसर राजकीय नेत्यांना पडलेला दिसत आहे.याची जाणिव करुन देण्यासाठी पत्रकारांच्या विविध समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी सदर पत्रकार संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले असून दि.२८ जुलै २०२४ पासुन नागपूर येथील दिक्षा भूमी पासुन या यात्रेची सुरुवात करण्यात येणार आहे. दि.८ आॉगस्ट २०२४ रोजी मुंबई मंत्रालय येथे सांगता होणार आहे .या निमित्ताने या पत्रकार संघाच्या तुळजापूर तालुका शाखेच्या वतीने नळदुर्ग येथे पोस्टर प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
  प्रारंभी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर संविधान चौकाच्या नामफलकास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते पत्रकार संवाद यात्रेचे पोस्टर प्रकाशन करण्यात आले.

  यावेळी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष  अरुण लोखंडे, पत्रकार संघाचे मंत्रालयीन प्रतिनिधी अहमद शेख,संघाचे सुनील माळगे, संजय पीसे, शामकांत ‌नागीले, इरफान काझी, एस.के.गायकवाड, किशोर धुमाळ, अजिंक्य मस्के पत्रकार संजय रेनुके, भगवंत सुरवसे, सामाजिक कार्यकर्ते सतिश गंगणे, सहशिक्षक राम शेट्टी सह पत्रकार, कार्यकर्ते  उपस्थित होते.
 
Top