नळदुर्ग, दि.१२
नळदुर्ग येथिल जगताप नगर याठिकाणी करण्यात येत असलेल्या रस्ता कामाचे मोजमाप करत असताना कामावरील युवकाचा विजेचा धक्का लागुन दुर्दैवी मृत्यु झाला आहे. विजेच्या तारा जमिनीपासुन अगदी कमी उंचीवर असल्याने हा अपघात झाला आहे.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या निधीतून नळदुर्ग शहरात सरासरी ७५ कोटी रुपयाची विकास कामे होत आहेत. ही कामे सार्वजनिक बांधकाम उपविभाग तुळजापूर यांच्याकडुन करण्यात येत आहेत. हे काम कृष्णाई कन्स्ट्रक्शन कंपनी पुणे करीत आहे. बुधवारी जगताप नगर येथे करण्यात येणाऱ्या रस्ता कामाचे मोजपाम करीत असताना कामावरील युवक विकास शिवाजी राठोड (वय २६ ) वर्षे रा. जकनी तांडा या युवकाचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यु झाला. विकास हा रस्त्याचे मोजमाप करीत असताना त्याच्या हातातील लोखंडी पट्टीचा संपर्क वर असणाऱ्या विजेच्या तारेशी झाला आणि क्षणात विकासचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यु झाला. या अपघातास वीजवितरण कंपनीचा कारभार जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. कारण ज्या ठिकाणी ही घटना घडली. त्याठिकाणी विजेच्या तारा अतीशय खाली आहेत. या विजेच्या तारा उंच राहिल्या असत्या तर ही घटना घडली नसती. वीजवितरण कंपनीबरोबरच ज्या कंपनीने या रस्ता कामाचा ठेका घेतला आहे ती कंपनीही कांही प्रमाणात जबाबदार असुन काम करणा-या कामगाराना सुरक्षा साम्रगीही दिले नसल्याचे दिसुन आले.