शंभराव्या नाट्य संमेलनानिमित्त धाराशिव येथे नाट्य जागर ; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेकडून आयोजन

 धाराशिव, दि. २ -

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शंभराव्या नाट्य संमेलनानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. याच अनुषंगाने धाराशिव येथे 15 ते 18 ऑगस्ट या कालावधीत नाट्यप्रेमी, कलाकार व रसिकांसाठी नाट्य जागर होणार आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यातील नाट्य कलावंत, रसिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे नियामक मंडळ, मुंबईचे सदस्य तथा धाराशिव शाखेचे अध्यक्ष विशाल शिंगाडे यांनी केले आहे.


शहरातील नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात 15 ते 18 ऑगस्ट असे चार दिवस नाट्य जागर कार्यक्रमात सुगम गायन, झाडीपट्टी व्यवसायिक नाटक तसेच सिने कलाकारांचे व्यावसायिक नाटक व लावणी महोत्सव व अनेक नाटकांची मेजवानी सादर करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र लोककला संचालनालयाचे प्रमुख तथा संचालक डॉ. गणेश चंदनशिवे हे तमाशाच्या इतिहास कार्यक्रम सादर करणार आहेत. 

कार्यक्रमाास पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार कैलास पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्यासह नाट्य व सिने अभिनेते तथा नाट्य परिषदेचे केंद्रीय शाखेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच मराठी नाट्यसृष्टीतील विविध कलावंत हजेरी लावणार आहेत.


 तरी नाट्यप्रेमी, कलाकार व रसिकांसाठी नाट्य जागर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यातील नाट्य कलावंत, रसिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नाट्य परिषदेच्या धाराशिव शाखेच्यवतीने करण्यात आले आहे.

स्थानिक कलावंतांसाठी नाट्य स्पर्धा
धाराशिव तालुक्यातील विद्यार्थी गटासाठी व खुल्या गटासाठी नाट्य व नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यशस्वी प्रथम तीन विजेत्यांना भरघोस बक्षिसे दिली जाणार आहेत. विद्यार्थी गट इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या असून खुला गट इयत्ता अकरावीपासूनचा असणार आहे. नाट्य सादरीकरणासाठी एक तासाचा वेळ आहे. नृत्य सादरीकरणासाठी 10 मिनिटे वेळ असणार आहे. सादरीकरणासाठी लागणारे सर्व साहित्य संबंधितांनी स्वतः आणावयाचे आहे. या कार्यक्रमात तालुक्यातील लोककलावंताचा मेळावा होणार आहे. त्यांना सादरीकरणही करण्याची संधी दिली जाईल. त्यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे. 

सादरीकरण करणार्‍या लोककलावंतांना एस. टी. प्रवासभाडे खर्च दिला जाणार आहे. इच्छूकांनी नाट्यपरिषदेच्या पदाधिकारी शशिकांत माने मो. 9421361501, सतिश ओव्हाळ मो. 9623665817, योगेश वाघमारे मो. 9881999699 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. 

 
Top