नळदुर्ग:  विकास कामे अर्धवट, संबंधित कंत्राट रद्द करण्याच्या मागणीसाठी  मनसेचे उपोषण नगरपालिके समोर सुरु 

नळदुर्ग, दि.१५

नळदुर्ग शहरातील विकास कामाचे कंत्राट रद्द करून पुनःश्च नव्याने निविदा प्रक्रिया करावी व सुशिक्षित बेरोजगार अभियंता,मजूर संस्था,व पात्र नोंदणीकृत कंत्राटदार यांचा  कोटा निश्चित करावा या मागणीसाठी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गुरुवार दि-15 ऑगस्ट रोजी नगरपालिकेसमोर  उपोषण सुरु केले आहे.         

  जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,शहराध्यक्ष अलिम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,शहर संघटक रवि राठोड,मनविसे तालुकाध्यक्ष सूरज चव्हाण आदिनी उपोषण सुरु केले आहे.

नगरपालिकेकडून गतवर्षी जवळपास आठ कोटीचे विकासकामाची निविदा निघाली होती,त्यात पालिकेने पात्र ठरवलेल्या नोंदणीकृत ठेकेदार कंपनीस कंत्राट मिळाले , दि. 20 जून 2023 रोजी सर्व कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आला होता,परंतु अनेक ठिकाणची कामे  आजही चौदा महिन्यानंतर अर्धवट आवस्थेत आहेत. 


त्यात गेल्या फेब्रुवारी-मार्च मध्ये दुसरी निविदा प्रक्रिया पार पडली. ती साडे सात कोटीच्या  जवळपास असून ही निविदा सुद्धा ह्याच नोंदणीकृत ठेकेदार कपंनीस मिळाली. निविदा प्रक्रिया करताना विशिष्ट ठेकेदाराचा विचार करून जाचक अटी घातल्या गेल्या नाहीत का? असा प्रश्न सुशिक्षित बेरोजगार अभियंता व मजूर संस्थाना पडला आहे. वास्तविक पाहता शासन निर्णयानुसार निविदा प्रक्रिया पार पाडत असताना 40:26:34 या पद्धतीने सुशिक्षित बेरोजगार अभियंता,मजूर संस्था,पात्र नोंदणीकृत ठेकेदार असा कोटा निश्चित करणे बंधनकारक आहे,परंतु शासन निर्णयाला केराची टोपली दाखवत निविदा प्रक्रिया झाल्या असल्याने व गतवेळेस दिलेले विकासकामे अर्धवट ठेवून या ही निविदेतील कामाचा कार्यारंभ आदेश देऊन सहा महिने होत आहेत. एकही काम पूर्ण झाले नाही. तर ऐंशी टक्के कामे सुरु न झाल्याने व पालिकेने वारंवार नोटीसा बजावून ही कामे सुरु करू न शकल्याने सदर कंत्राट रद्द का केलं नाही.पालिका या कंत्राटदारावर इतकी मेहरबानी का दाखवत आहे.असा आरोप करण्यात आला आहे.


दोन्ही निविदेतील कामे करण्यासाठी कंत्राटदार सक्षम नसल्याने कंत्राट रद्द करून पुनःश्च नव्याने निविदा प्रक्रिया करावी व सुशिक्षित बेरोजगार अभियंता,मजूर संस्था,व पात्र नोंदणीकृत कंत्राटदार यांचा 40:26:34 नुसार कोटा निश्चित करावा जेणे करून शहरातील विकास कामे प्रभावीपणे व गतीने व चांगल्यादर्जाची होतील. असेही मनसे कार्यकर्त्यांनी संबंधिताना यापुर्वी दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे.

 
Top