निरोगी महाराष्ट्राच्या संकल्पासोबतच जिल्हयाच्या

सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द -पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत


 

धाराशिव दि.17 सप्टेंबर (जिमाका) जिल्हयाचे मागासलेपण ओळखून केंद्र सरकारने जिल्हयाचा समावेश आकांक्षित जिल्हयात केला आहे.जिल्हयाचे मागासलेपण दूर करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे.सार्वजनिक आरोग्य विभागाचा मंत्री म्हणून 24 महिन्यात 42 निर्णय घेवून महाराष्ट्र निरोगी करण्याचा संकल्प केला असून जिल्हयाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द असल्याची ग्वाही पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी दिली.

        आज 17 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करतांना पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत बोलत होते.

       

 यावेळी स्वातंत्र्य सैनिक भास्करराव नायगावकर, बुबासाहेब जाधव, प्रकाशराव तोडकरी,गोविंद नलवडे,शेषराव बनसोडे व बाळासाहेब टापरे, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार सर्वश्री कैलास पाटील, राणाजगजितसिंह पाटील, ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनाक घोष,पोलीस अधिक्षक संजय जाधव,अपर पोलीस अधिक्षक गौहर हसन व निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव व विविध राजकीय पक्षाच्या  प्रमुख पदाधिकाऱ्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.


 पालकमंत्री प्रा.डॉ. सावंत म्हणाले की, मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या लढयात ज्या ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली,त्या सर्वांना मी विनम्रपणे अभिवादन करतो.15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला.मात्र, हैद्राबादच्या निजाम संस्थानाने भारतात विलीन होण्यास नकार दिला. भारतीय स्वातंत्र्याच्या लढयानंतर तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वात आणि क्रांतीसिंह नाना पाटील व स्वामी रामानंद तीर्थ यांच्या सारख्यांच्या मार्गदर्शनात मराठवाडा मुक्ती संग्रामात अनेक स्वातंत्र्यसैनिक एकत्र आले. जिल्हयात मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा अधिक तीव्रतेने लढला गेला. निजामाच्या विरोधात गावोगावी जनता जागी होवू लागली होती असे त्यांनी सांगितले.


हैद्राबाद संस्थानने भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यावर आणि तिरंगा फडकविण्यावर  बंदी घातली होती असे सांगून प्रा.डॉ.सावंत म्हणाले, या बंदीला झुगारुन स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. चिलवडीच्या रामभाऊ जाधव या  स्वातंत्र्यसैनिकाने शेकडो लोकांना एकत्र करुन खेडयापाडयात तिरंग्याची मिरवणूक काढली. 13 सप्टेंबर 1948 रोजी ऑपरेशन पोलो मोहिमेअंतर्गत भारतीय लष्कराने चारही बाजूंनी हैद्राबादमध्ये सैनिक घुसवले. अखेर 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामाने शरणागती पत्करली. 109 तासांच्या संघर्षानंतर भारतीय लष्कराने हैद्राबाद संस्थान ताब्यात घेवून भारतीय संघराज्यात विलीन केल्याचे ते म्हणाले.

        

आजच्या 76 व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मला सांगताना आनंद होत असल्याचे सांगून प्रा.डॉ.सावंत म्हणाले, आरोग्यविषयक अनेक योजना,मोहिमा व अभियान सुरु करुन आशा व गट प्रवर्तक कर्मचारी यांना विमा कवच लागू करून त्यांच्या मानधनात वाढ केली.महात्मा फुले जनआरोग्य योजनेची मर्यादा दीड लाखावरून पाच लाख रूपयांपर्यंत वाढविली.केद्र सरकारने 70 वर्षावरील सर्वांना मोफत उपचार करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे देशातील साडे चार कोटी व्यक्तींना मोफत उपचार मिळणार आहे.याचा लाभ 44 लाख माता आणि 48 लाख 70 वर्षावरील नागरिकांना मिळणार असल्याचे ते म्हणाले.


आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी  या आरोग्यविषयक उपक्रमाची दखल इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांनी सलग तिसऱ्यांदा नोंद घेवून हॅट्रीक केल्याचे सांगून प्रा.डॉ. सावंत पुढे म्हणाले, 26 लाखांपेक्षा जास्त वारकरी बंधू-भगिनींना या उपक्रमातंर्गत मोफत आरोग्य सेवा देण्यात आली. धाराशिव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी 30 एकर जागा हस्तांतरित करण्यात आली असून इमारतीच्या बांधकामासाठी 550 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हयाच्या ठिकाणी जिल्हयातून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना चांगल्या आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी 500 खाटांचे नवीन जिल्हा सामान्य रुग्णालय मंजूर केले आहे. रुग्णालयाच्या इमारत बांधकामासाठी 25 एकर जागा हस्तांतरित करण्यात आली आहे. या बांधकामासाठी 350 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. 200 खाटांचे महिला रुग्णालय आणि परंडा येथे 100 खाटांचे महिलांचे रुग्णालय मंजूर करण्यात आले आहे.या रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम काम प्रगतीपथावर असल्याचे  प्रा.डॉ.सावंत म्हणाले.


भूम-परंडा व वाशी या दुष्काळी तालुक्यात भुगर्भातील पाण्याची पातळी वाढली पाहिजे यासाठी आपल्या खर्चातून वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवजलक्रांती योजना राबविण्यात आल्याचे सांगून प्रा.डॉ.सावंत म्हणाले, या योजनेच्या माध्यमातून या तीन तालुक्यातील जवळपास 250 गाव-शिवारात जलसंधारणाचे काम करण्यात आले. त्यामुळे सिंचन प्रकल्प क्षेत्रात 4 टिएमसी तर जमिनीत 12 टिएमसीपेक्षा अधिक भुजलसाठा वाढण्यास मदत झाली आहे.

 या तालुक्यांच्या ठिकाणी नवीन औद्यागिक वसाहती अर्थात एमआयडीसी मंजूर करण्यात आल्याचे ते म्हणाले.


प्रा.डॉ.सावंत म्हणाले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जिल्हयात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्हा या योजनेत राज्यात अव्वलस्थानी आहे. 16 सप्टेंबरपर्यत 3 लक्ष 92 हजार 924 महिला योजनेच्या लाभासाठी पात्र ठरल्या आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत जिल्हयात आतापर्यंत 3 हजार 569 प्रशिक्षार्थी शासकीय आस्थापनेत आणि 358 खाजगी आस्थापनेत असे एकूण 3927 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणासाठी रूजू झाले आहेत असे त्यांनी सांगितले.


मुलींना गावापासून शिक्षणासाठी दुसऱ्या गावाला जाण्यासाठी एसटी महामंडळाने मोफत प्रवासासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण विद्यार्थीनी मोफत पास योजनेचा दोन वर्षात जिल्हयातील शिक्षण घेणाऱ्या 47 हजार विद्यार्थीनींना लाभ मिळाला असल्याचे सांगून प्रा.डॉ.सावंत पुढे म्हणाले, या योजनेमुळे मुलींना आपले शिक्षण घेण्यास  फायदा होत आहे. एसटी बसेसमध्ये महिलांना 50 टक्के प्रवास सवलत देण्यासाठी महिला सन्मान योजना सुरू केली आहे. दोन वर्षात जिल्हयातील 1 कोटी 87 लाख महिलांनी या योजनेचा विविध ठिकाणच्या प्रवासा दरम्यान लाभ घेतला आहे.आई श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनाला देशभरातील भाविकांना रेल्वे मार्गाने सहज येण्यासाठी धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. या रेल्वेमार्गासाठी राज्य सरकारने 452 कोटी रुपये आणि केंद्र सरकारने 327 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन दिल्याचे डॉ.सावंत म्हणाले.

      

 प्रारंभी पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या स्मृती स्तंभास अभिवादन केले.पालकमंत्र्यांनी ध्वजारोहण केल्यानंतर राष्ट्रगीत व राज्यगीत झाले.यावेळी स्मृतीस्तंभास पोलीस पथकाने बंदुकीच्या फैरी हवेत झाडून मानवंदना दिली.आजपासून 2 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या केंद्र सरकारच्या स्वच्छताही सेवा या अभियानाचा शुभारंभ पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत यांनी केला.पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत यांच्या संकल्पनेतून राबविलेल्या “आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी  या आरोग्यविषयक उपक्रमाची दखल इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांनी सलग तिसऱ्यांदा नोंद घेतल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत यांचे पुष्पगुच्छ,शाल श्रीफळ देवून सत्कार करून अभिनंदन केले. पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत यांच्या हस्ते जिल्हास्तरीय युवा पुरस्काराचे वितरण करण्यात आले.यावेळी पालकमंत्र्यानी कार्यक्रमाला उपस्थित स्वातंत्र्य सैनिक,स्वातंत्र्य सैनिकांचे ज्येष्ठ नागरिक, विविध विभागाचे प्रमुख अधिकारी-कर्मचारी,  विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी,पत्रकार बांधव व नागरिकांची भेट घेतली कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार शिक्षक हनमंत पडवळ यांनी मानले.


 
Top