नळदुर्ग भुईकोट किल्ल्याची दुरावस्था; गडप्रेमी नागरिक, पर्यटकांतुन संताप
नळदुर्ग, दि.१३.: सप्टेंबर
राज्यातील गड किल्ले व पर्यटन क्षेत्रात रोल मॉडेल म्हणून उदयास आलेल्या ऐतिहासिक नळदुर्ग शहरातील भुईकोट किल्ला सध्या जनावरांचे कुरण बनले आहे.तर किल्ल्याच्या तटभिंतीवर झाडे-झुडपे वाढले आहे. युनिटी कंपनीकडून किल्ला पुरातत्व विभागाच्या ताब्यात आल्यानंतर सव्वा महिन्यातच किल्ल्याची दुर्दशा झाल्याने गडप्रेमी व पर्यटकांतुन संताप व्यक्त केला जात आहे.
नळदुर्गचा ऐतिहासिक किल्ला महाराष्ट्र शासनाच्या वैभव संगोपन योजनांतर्गत सन २०१४ मध्ये करारान्वये सोलापूर येथील युनिटी मल्टिकाॕन्स प्रा. लि. या कंपनीस दहा वर्षासाठी संगोपनार्थ दिला होता. हा कालावधी पूर्ण होवून दि. १ आॕगष्टपासून किल्ला पुरातत्व विभागाच्या ताब्यात येवून सव्वा महिन्याचा कालावधी होत आला.
मात्र पुरातत्व खाते अपुरे कर्मचारी व मर्यादित साधनांमुळे भव्य किल्ल्याचे संगोपन करण्यास अपयशी ठरत आहे.
सोलापूर युनिटी कंपनीच्या पूर्वी म्हणजे दहा वर्षापूर्वी नळदुर्ग किल्ल्याची दयनीय आवस्था आठवल्यास गडप्रेमींना वेदना होतात. किल्ल्याचे बदललेले रुपडे व त्याचे महत्त्व कायम राहण्यासाठी त्वरीत पुढील कालावधीकरिता पुरातत्व (शासन) खात्याशी नव्याने करार करून किल्ल्याचे जतन व संगोपन करण्यासाठी संस्था , कंपनीस नव्याने करार करुन देण्याची मागणी इतिहास प्रेमी नागरिकांतून होत आहे.
अवाढव्य क्षेत्रावर असलेल्या किल्ल्याच्या बुरुज तसेच तटभिंतीवर मोठ्या प्रमाणात झाडे-झुडपे आल्याने किल्ल्याच्या बुरुज व तटबंदीला धोका निर्माण झाला असून पुरातत्व विभागाने तात्काळ याची दखल घेऊन किल्ल्याच्या बुरुज तसेच तटबंदीवरील झाडे-झुडपे काढणयाची गरज आहे.
पुरातत्व विभागाकडे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने पुरातत्व विभाग या किल्ल्याची देखभाल करू शकणार नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे हा किल्ला पुन्हा एकदा संगोपनासाठी देणे गरजेचे आहे. अन्यथा गेल्या दहा वर्षात झालेल्या विकास कामाची वाट लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पावसामुळे किल्ल्याच्या बुरुजावर तटभिंतीवर मोठ्या प्रमाणावर झाडेझुडपे उगवले आहे. झाडांची मुळे तटबंदी व बुरुजा मध्ये घुसल्याने किल्ल्याची तटबंदी तसेच बुरुजाना मोठा धोका निर्माण झाला आहे.
किल्ल्यामध्ये शेळ्या, जनावरांचे वावर वाढले आहे. जनावरांच्या मलमुत्रामुळे अस्वच्छता निर्माण होताना दिसुन येत आहे.तर झाडे, फुले, बागबगीचाचे नुकसान होताना दिसत आहे.युनिटी कंपनीने स्वच्छतेसाठी किल्ल्यात जागोजागी ठेवलेले कच-याचे प्लास्टिक डस्टबीनची माथेफिरूने नासधूस करुन बोरी नदीत फेकून दिले. त्यामुळे नदीचे पाणी दुषीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एवढे नव्हे तर सुरक्षेच्या दृष्टीने किल्ल्यातील ६ सिसिटीव्ही कॅमेरा फोडून नुकसान केले आहे. याप्रकरणी नळदुर्ग पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.तरीही पुरातत्व खाते शांत कसे काय याबाबत इतिहास प्रेमी नागरिकांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर पुरातत्व विभागाच्या सहसंचालक जया घोळवे- वहाणे यांच्याशी संपर्क साधला जनावरे हे किल्ल्यातील अतीक्रमण धारकांच्या असुन संबंधितांना तोंडी समज दिल्याचे सांगुन तटबंदी व बुरुजावरील झाडे झुडपे काढण्यासाठी अंदाज पत्रक तयार करण्याचे काम सुरु आहे.