महामहीम राष्ट्रपतींच्या जिवनावर आधारित चित्रपटाचे धाराशिव कनेक्शन. लवकरच होणार चित्रपट प्रदर्शित
धाराशिव,दि.२९ :
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या संघर्षशील जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती राजस्थान राज्यातील माऊंटअबू येथील "ओम शांती" प्रोडक्शनने केली आहे. "महामहीम दीदीजी" असे या चित्रपटाचे नाव असून, आदिवासी वर्गातून पुढे येऊन देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचण्याचा संघर्षशील प्रवास या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास या चित्रपटातून पाहायला मिळणार असून हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. या चित्रपटाचे गीत लेखन मुळ गाव लातूर जिल्ह्यातील असुन त्यांचा हल्ली मुक्काम वडगाव सिध्देश्वर (ता. जि.धाराशिव) आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा जन्म ओडिशामधील एका आदिवासी कुटुंबात झाला. घरात अठराविश्व दारिद्रय, शिक्षणाची सोय नाही, अशा अवस्थेत त्यांनी शिक्षण घेतले. त्यानंतर पाटबंधारे खात्यात नोकरी केली. परंतु लहान-लहान मुले असतानाच वैधव्य नशिबी आले. त्यावेळीही त्या प्रतिकूलतेचा सामना करीत पुढे आल्या आणि राजकारणात नगरसेवक, आमदार, राज्यपाल पदापासून थेट देशातील सर्वोच्च अशा राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचल्या. ,"महामहीम दीदीजी' या चित्रपटातून प्रथमत: खडतर जीवनप्रवास आणि अध्यात्मिक शक्ती व सहनशीलतेच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत सर्वोच्च स्थानापर्यंत कसा प्रवास केला, याचे सचित्र दर्शन घडणार आहे. प्रतिकूल स्थितीत ब्रम्हकुमारीजशी जोडल्या गेल्या आणि अध्यात्मिक ज्ञानाच्या जोरावर त्या संघर्ष करीत सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकल्या, हेच यातून चित्रपट निर्मात्यांना सांगायचे आहे.
बी. के. प्रभा मिश्रा या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत तर चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन बी. के. पंपोष मिश्रा यांनी केले आहे. अभिनेत्री संपा मंडल, एल. आकांक्षा, नैना रघुवंशी आणि सोनाली पांडे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांची भूमिका साकारली आहे. गीतलेखन बी. के. सुरभी यांनी केले तर संगीत नरेंद्र पुरोहित आणि सुनील दधीची यांचे आहे. या चित्रपटाचे शूटिंग प्रामुख्याने मुर्मू यांचे मूळ गाव ओडिशातील उपरखेडा येथे करण्यात आले. जवळपास ३ महिने शूटिंग करून या चित्रपटाची निर्मिती केली. सरकार सध्या महिला सबलीकरणावर विशेष लक्ष देत आहे. हा चित्रपटदेखील महिलांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास चित्रपटाच्या निर्मात्या प्रभा मिश्रा यांनी व्यक्त केला.
चित्रपटाच्या गीतकार या आहेत
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या जीवनावर आधारित "महामहीम दीदीजी" या चित्रपटातील गीतलेखन वडगाव सिध्देश्वर (धाराशिव ) येथील भाग्यश्री भोजने ऊर्फ बी. के. सुरभी यानी केले आहे. त्या मराठी कवयित्री असून बी. के. सुरभी टोपण नावाने कविता लेखन करतात. त्यांनी यापूर्वी पाच चित्रपटात गीत लेखन केले आहे. या संपूर्ण चित्रपटात एकच गीत आहे. त्याचे गायन सुप्रसिध्द गायिका साधना सरगम यांनी गायले आहे. याबद्दल बी.के. सरभी यांचे धाराशिव ब्रह्मकुमारी केंद्राचे ब्रह्मकुमार सुरेशभाई जगदाळे, तुळजापूर केंद्राच्या ब्रह्मकुमारी स्मिता बहेनजी, संपादक वशिष्ठ घोडके, पत्रकार शिवाजी नाईक, राजेंद्र माळी, धाराशिव अक्षरवेल साहित्य मंडळाच्या अध्यक्षा कमल नलावडे, प्रा. सुलभा देशमुख, रेखा ढगे, साहित्यिक तथा गझलकार ,सुनीता गुंजाळ प्रा. विद्या देशमुख, शिवानंदा माळी, नळदुर्गच्या कवित्री तथा सहशिक्षिका कविता पुदाले, लता नाईक,माधुरी घोडके, मधुकर मुळे आदींनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
लातुर जिल्ह्यातील हिप्परगा (ता. औसा) येथील कन्या आणि धाराशिव जिल्ह्यातील सिद्धेश्वर वडगावच्या स्नुषा आहेत. ग्रामीण भागातील एका कवयित्रीने थेट महामहीम राष्ट्रपतींच्या जीवनावर आधारित चित्रपटात गीतलेखन केले हे धाराशिवसाठी गौरवास्पद आहे.