धर्मशाळेत मुक्काम, घरची भाकरी, भावी आमदाराचे अजब फंडे ठरताहेत लक्षवेधी
तुळजापूर, दि.२८: शिवाजी नाईक
ओल्या पार्ट्या नाही, बॅनरबाजी नाही, जाहिरात बाजीही नाही, गावभेटी दरम्यान लोकांना आकर्षित करण्यासाठी कसलीही वस्तु भेट नाही , कसलाही बडेजाव न करता अपक्ष उमेदवार अण्णासाहेब दराडे यांनी समाजातील विदारक चित्र गावा गावात मांडण्यास सुरवात केल्यामुळे प्रस्थापितानी धसका घेऊन प्रशासनाकरवी आडकाठी करण्याचा प्रयत्न चालविल्याची नागरिकात जोरदार चर्चा रंगत आहे.
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीपासून तुळजापूर विधानसभा मतदारसंघात पारंपारिक उमेदवाराला पसंती न देता परिवर्तन झाले. आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत यावेळी मतदार नव्या चेहऱ्याला पसंती देणार का ?. याबाबत नागरिकात चर्चा रंगत असुन तुळजापूर विधानसभा काबीज करण्यासाठी ईच्छकाकडुन प्रयत्नांची पराकाष्ठा होताना दिसत आहेत.
तर पक्षाची उमेदवारीवरुन काँग्रेसमध्ये गटबाजी झाल्याचे चव्हाट्यावर आले आहे.
पावसा पाण्यात सुध्दा युद्ध पातळीवर ईच्छकाकडुन मतदार संघात अनेक कार्यक्रमाची रेलचेल व रंगत वाढत आहे. सर्वत्र गावोगावी चौकात डिजिटल बॅनर लावल्याचे दिसत आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला नसला तरी इच्छुकांनी मतदारसंघात भाऊ गर्दी केली आहे. मतदारापर्यंत पोहोचून संवाद साधुन त्यांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार नाना कल्पकता लढवताना दिसत आहे.
अपक्ष उमेदवार अण्णासाहेब दराडे यांचा हटके कार्यक्रम
अपक्ष उमेदवार अण्णासाहेब दराडे यांचा तुळजापूर मतदारसंघात हटके कार्यक्रम सुरू असल्याचे दिसुन येत आहे. शेतकऱ्यांची व्यथा ,शिक्षणाची, रुग्णालयाची दुरावस्था प्रशासनातील गैरप्रकार आणि सत्ताधारी व विरोधकांसह राजकीय पक्षांची खलबते, देशाच्या सीमेवर अहोरात्र पहारा देणाऱ्या जवानाबद्दलची सचित्र माहितीचे चित्ररथाव्दारे गावोगावी भेटी देत वास्तवाचे दर्शन घडवित ग्रामीण भाग पिंजुन काढीत आहेत.
उमेदवारांची मतदार संघ पिंजून काढताना दमछाक होत आहे. कारण ग्रामीण भागातील रस्त्यांची फार मोठी दुर्दशा झालेली आहे. त्याचबरोबर पाणी, लाईटसह शेतकऱ्यांच्या समस्या ऐकुन घ्यावे लागत आहे. गावातील सभागृह हे शोभेचे वास्तू बनल्याचे दराडे यांनी सांगून या सभागृहात एकही विवाह सोहळा पार पडला नाही. उलट बेकायदेशीर धंदे होत असल्याचे ग्रामस्थांकडून तक्रार ऐकण्यास मिळत असल्याचे सांगितले.. चित्ररथासह दराडे ज्याठिकाणी पोहोचतात तेथे कायम लोकांची गर्दी खेचत आहे.
राजकीय पुढार्यानी या मतदारसंघात उजनीचे पाणी आणण्याची नुसत्याच वल्लगना केल्याचे सर्वश्रुत आहे. मात्रा दराडे यांनी उजनीचे पाणी टँकरद्वारे आणले आहे. गावा गावातील मंदिरात या पाण्याने जलाभिषेक करीत आहेत. दिवसभराच्या कार्यक्रमानंतर रात्रीच्या वेळी एखाद्या मंदिरात किंवा शेतातील कोट्यात अण्णासाहेब दराडे व त्यांची टिम विश्रांती घेतात. अण्णासाहेब दराडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था गावोगावी ग्रामस्थ , विशेषता हगलूरचे ग्रामस्थ भोजन घेऊन दराडे मुक्कामी असलेल्या ठिकाणी येत आहेत.
घर सोडून एक महिना होत आला. आता मतदान करुनच घरी जाणार असल्याचे "तुळजापूर लाईव्ह" शी बोलताना त्यांनी सांगितले.
इच्छुक उमेदवार
काँग्रेसचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, जिल्हा अध्यक्ष धीरज पाटील, राष्ट्रवादीचे नेते अशोक जगदाळे, डॉ. स्नेहा सोनकाटे,माजी नगराध्यक्ष देवानंद रोचकरी, प्रतिक रोचकरी, भाजपचे बसवराज मंगरुळे, सुधाकर गुंड आदीसह अनेक जण उमेदवार इच्छुक आहेत.