नळदुर्ग: पर्यटकांची प्रतिक्षा संपली, डोळ्याचे पारणे फेडणारे ऐतिहासिक किल्ल्यातील प्रेक्षणीय नर - मादी धबधबा सुरु
नर - मादी धबधबा पाहाण्या साठी पर्यटकांची उसळली गर्दी
नळदुर्ग,दि.२८: एस.के.गायकवाड
दोन वर्षांपासून नळदुर्ग येथील ऐतिहासिक भूईकोट किल्ल्यातील नर-मादी धबधब्याचे नयनरम्य दृश्य पहाण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व पर्यटक प्रतिक्षा करत होते.यावर्षीच्या परतीच्या प्रवासाने नळदुर्ग व परिसरात समाधानकारक हजेरी लावली .नळदुर्गचे बोरी धरण शंभर टक्के भरले. बोरी धरणाचा सांडवा वाहू लागला आणि येथील ऐतिहासिक किल्ल्यातील नर आणि मादी धबधबे प्रवाहीत झाल्याने पर्यटकांची प्रतिक्षा संपली असून ओसंडून वाहणारे नरमादी धबधबे पहाण्यासाठी आता दिवसेनदिवस पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.
नळदूर्ग येथील १२५ एकर क्षेत्रावर बांधण्यात आलेला ऐतिहासिक किल्ला हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा भूईकोट किल्ला म्हणून ओळखला जातो.या किल्ल्याच्या पुर्व आणि पश्चिम टोकाला जोडणारा मोठा बंधारा बांधण्यात आलेला आहे.या बंधाऱ्यामुळे बोरी नदीचे पाणी अडवले जाते. या बंधऱ्याचे अतिरिक्त पाणी जाण्यासाठी बंधाऱ्याच्या पुर्व व पश्चिम टोकाला ८० फुट उंची वरुन खाली पाणी पडणारे दोन सांडवे सोडण्यात आले आहेत.पावसाळ्यात नदीला पूर आला की हा बंधारा भरून अतिरिक्त पाणी त्या सांडव्यावाटे बाहेर खाली कोसळते व ते पाणी बोरी नदीत पुढे प्रवाहीत होते,सांडव्यावाटे उंचावरून कोसळणाऱ्या पाण्यामुळे या ठिकाणी नयनरम्य धबधबे तयार होतात.पश्चिम टोकाला असलेला सांडवा हा पुर्व बाजूच्या सांडव्या पेक्षा थोडा उंची वरुन वहातो . त्यामुळे तो नर धबधबा म्हणून ओळखला जातो .या उलट पुर्व बाजूचा सांडवा थोडासा कमी उंचीवरून वहातो. त्यामुळे तो मादी धबधबा म्हणून ओळखला जातो.दोन्ही धबधबे ओसंडून वाहू लागले की एक प्रेक्षणीय नयन रम्य नैसर्गिक चित्र निर्माण होते व पर्यटकांचे लक्ष वेधून घेते.सध्या नर - मादी धबधबे खूप मोठ्या प्रमाणात प्रवाहीत झाल्याने नळदुर्गकर व येणारे पर्यटकामध्ये आनंदी व उत्साही वातावरणात निर्माण झाले आहे.
गतवर्षी कमी पाऊस झाल्याने नळदुर्गच्या ऐतिहासिक नगरीमध्ये नर - मादी धबधबा व शिल्लक धबधबा हे दोन्ही ही धबधबे सुरू न झाल्याने पर्यटकांमध्ये नाराजी दिसून येत होती.परंतू आजच्या परिस्थितीत नर - मादी व शिल्लक धबधबा खूप मोठ्या प्रमाणात कोसळत असतानाचे नयमरम्य दृश्य दिसून येत आहे.
किल्ला पाहाण्यासाठी महाराष्ट्र , कर्नाटक आंध्र प्रदेश आदी राज्यातून नळदुर्गच्या शहरात हजारोच्या संख्येने पर्यटक दाखल होत आहेत.
नरमादी धबधबे शिवाय या किल्ल्यावर टेहळणीसाठी किल्ल्यातील मध्यवर्ती ठिकाणी बांधण्यात आलेला उपल्या बुरुज,कळवातीन महाल, नरमादी धबधब्याच्या बंधाऱ्यामध्येच कौशल्याने बांधण्यात आलेला पाणी महल, किल्ल्यातील राजवाडा, किल्ला प्रवेशद्वार, किल्ल्याच्य तटबंदीचे बांधकाम, नर धबधब्याच्या बाजूला असलेला गणपती महाल, बुरुजावरील तोफा, आसा कितीतरी बाबी पाहण्यासारखे सारख्या आहेत.
एकंदरीत नळदुर्ग येथील ऐतिहासिक ठिकाण म्हणून महाराष्ट्रात नव्हे तर देशातील कानाकोपऱ्यात प्रसिद्ध असलेल्या येथील भुईकोट कील्ला पर्यटकासह इतिहास प्रेमींचे आवडीचे ठिकाण आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेला व स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून ह्या किल्ल्याची इतिहासाने नोंद घ्यावी असं आहे.त्यामुळे दररोज हजारोंच्या संख्येने पर्यटक या किल्ल्याला भेट देण्यासाठी येत आहेत.