गणेशउत्सव आनंददायी साजरा करूया
लेखिका उज्वला शिंदे

श्रावण महिन्याची सांगता झाली अन् भाद्रपद पुढ्यात उभा राहिला.श्रावण महिन्याचे धार्मिक महत्त्व सर्वश्रुतआहेच. उत्सवप्रिया: खलु मानवा: असे संस्कृत साहित्यकार कविकुलगुरू कालिदास यांनी म्हटले आहे ते अगदी समर्पक आहे. श्रावणातील निसर्ग बदलाने मानवीय मनावर होणारा रमणीय परिणाम जीवनाला उत्साही,टवटवीत अन् तजेलदार बनवतो.श्रावणातील व्रतवैकल्य ही निसर्गाप्रति कृतज्ञता व्यक्त करणारी आहेत.मग त्यातील येणारा पंचमीचा सण असो,नारळी पौर्णिमा वा बैलपोळा असो.मानवाला सहकार्य करणाऱ्या निसर्ग घटकांप्रति व्यक्त केलेली ही कृतज्ञता निश्चितच स्तुत्य आहे.


भारतीय समाजातील सणांचे ढोबळमानने दोन प्रकारात वर्गीकरण करता येईल.एक जे निसर्गातील बदला ला स्वीकारून त्याचाआनंदोत्सव साजरा करतात अन् दुसरा प्रकार म्हणजे सामाजिक प्रबोधनासाठी ज्या सणांची निर्मिती केली गेली आहे असे सण.या मध्ये शिवजयंती व गणेशोत्सव यांचा विशेष करून अंतर्भाव करावा लागतो.भाद्रपद महिन्यातील सर्वात मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणारा सण म्हणून आपण गणेशोत्सव या सणाकडे पाहतो. 

श्रीगणेशाच्या आगमनाची आतुरता लहानथोर अशा सर्वानाच लागलेली असते.सर्वत्र उत्साहित करणारे मंगलमय वातावरण श्रींच्या आगमनाची चाहूल लावणारे असते.अशा या उत्सवाची प्रारंभकथा सर्वश्रुत आहे.लोकमान्य टिळकांनी ज्यावेळी या दोन्ही उत्सवांची सुरुवात केली तेव्हा त्या मागचा उद्देश अतिशय स्पष्ट, प्रामाणिक आणि शुद्ध होता. देशभक्तीची भावना ज्यांच्या ठायी ओसंडून वाहत होती अशा टिळकांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक मार्ग चोखाळले.त्या पैकीच एक म्हणजे समाज जागृती व्हावी ,देशभक्तीची भावना वाढीस लागून लोकांमध्ये ब्रिटिश सत्तेविरुद्ध नाराजी निर्माण करून स्वातंत्र्याचे बीज रुजवण्यासाठी,समाज प्रबोधनासाठी निर्माण केलेला हा गणेशोत्सव सण आहे.
     

 ज्यावेळी या गणेशोत्सवाची सुरुवात केली गेली, त्यावेळी प्रबोधन करणे हाच उद्देश असलेल्या या उत्सवात कालानुरूप बदल होणे आवश्यक होते. लोक जागृतीसाठी संघटित होणे एकत्रित येणे ही त्या काळाची गरज होती आजच्या काळाची गरज काही वेगळी आहे प्रबोधन हाच उद्देश या उत्सवाचा कायम ठेवला तर आजच्या काळाला अनुसरून ज्या गोष्टींसाठी प्रबोधन होणे गरजेचे आहे ते या उत्सवाद्वारे व्हावे हेच अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र काही वेगळेच घडताना दिसून येते. काळ परिवर्तनशील आहे तेव्हा त्या नियमाला अनुसरून अशाप्रकारचे उत्सव सुद्धा परिवर्तनशील असले पाहिजेत.परंतु अशा उत्सवातून विधायक परिवर्तन न होता असे उत्सव राजकीय दृष्टीतून आर्थिक उलाढालीची आणि प्रचार प्रसाराची माध्यमे होताना दिसत आहेत.आज समाजापुढे असलेल्या अनेक समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्याप्रती जाणीवजागृती करता येणे,यथाशक्ती सामूहिक संघटनातून समस्यांचे उच्चाटन करणे,देशाच्या प्रगतीला हातभार लावण्यासाठी अशा उत्सवांची मदत घेणे,अशा प्रकारे उत्सवांद्वारे नवभारताची आखणी करणे हे या उत्सवांचे उद्दिष्ट्य असावयाला हवे.परंतु आज या उत्सवांचे स्वरूप अतिशय चिंताजनक बनत चाललेले आहे.मोठमोठ्या ध्वनी क्षेपकांचा वापर,त्यातून होणारे ध्वनी प्रदुषण, मोठमोठ्या श्रींच्या मुर्त्यांचे समुद्रात विसर्जन आणि त्यातून होणारे जप्रदुषण,पट्टी च्या नावाखाली कितीतरी रुपयांची उलाढाल होणे व त्याचा विनियोग अयोग्य,अविधायक गोष्टीसाठी केला जाणे हे सामाजिक अहिताला दर्शविणारे आहे.संस्कारक्षम समाजाच्या मुळावर केलेला हा आघात पुढील पिढ्यांना हिंसक अन् व्यभिचारी बनविण्यास कारणीभूत ठरता कामा नये.यासाठी अशा उत्सवांच्या माध्यमातून चांगली समाजनिर्मिती होण्यासाठी,भविष्यातील देशाच्या प्रगतशील वाटचालीसाठी समर्पक प्रबोधन होणे आवश्यक आहे.तेव्हा या गणेशोत्सवाला खऱ्या अर्थाने सार्थकी लावण्यासाठी ऐक्याचा भाव वाढीस लावून सशक्त ,संस्कारक्षम, पुरोगामी विकसित राष्ट्र निर्माणासाठी एक पाऊल पुढे टाकत राष्ट्र बांधणीसाठी कटिबध्द होवूया. कोणत्याही राजकीय गटाच्या अधीन न जाता उत्सवांच्या साजरीकरणाचे शास्त्र शुद्ध दृष्टीने खरे गमक समजून घेवून भावी विकासाकडे वाटचाल करीत आनंददायी उत्सवांना साजरे करू या.


 श्रीमती उज्वला शिंदे धाराशिव
 
Top